Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 135 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराची थोरवी आणि मूर्तीची निरर्थकता

1 परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा; परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा;

2 परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा.

3 परमेशाचे स्तवन करा,2 कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे.

4 कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे.

5 परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो.

6 परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.

7 तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.

8 त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले.

9 हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले.

10 त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला; बलवान राजे मारून टाकले;

11 अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;

12 आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला; आपले लोक इस्राएल ह्यांना वतन करून दिला.

13 हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील.

14 कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.

15 राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.

16 त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही.

17 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.

18 त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.

19 हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर;

20 हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.

21 यरुशलेमेत वस्ती करणार्‍या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan