Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 132 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


पवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना
आरोहणस्तोत्र.

1 हे परमेश्वरा, दाविदाप्रीत्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर.

2 त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की,

3 “मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही;

4 मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही;

5 परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवासमंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन.”

6 पाहा, एफ्राथात आम्ही कोशाविषयी ऐकले; तो वैराण प्रदेशात आम्हांला सापडला.

7 “आपण त्याच्या निवासमंडपात जाऊ; त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू.”

8 हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये.

9 तुझे याजक नीतिमत्त्वाने भूषित होवोत; तुझे भक्त आनंदघोष करोत;

10 तुझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस.

11 परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे; तो माघार घेणार नाही; ती शपथ अशी की, “मी तुझ्या पोटच्या फळांतले तुझ्या राजासनावर बसवीन;

12 तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळतील, तर त्यांचीही मुले सर्वकाळ तुझ्या राजासनावर बसतील.”

13 परमेश्वराने सीयोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे.

14 “हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली.

15 मी तिला विपुल अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन.

16 मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करीन; तिच्यातील भक्त मोठा आनंदघोष करतील.

17 तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल1 असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे.

18 मी त्याच्या वैर्‍यांना लज्जेने वेष्टित करीन; पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan