स्तोत्रसंहिता 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना मुख्य गवयासाठी; आठव्या (मंद्र) स्वरावर गायचे दाविदाचे स्तोत्र. 1 हे परमेश्वरा, साहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही; मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत. 2 ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात, 3 खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको. 4 ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?” 5 परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.” 6 परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत. 7 हे परमेश्वरा, तू त्यांना सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील. 8 मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत चालतात. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India