स्तोत्रसंहिता 116 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती 1 मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. 2 त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. 3 मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले, 4 तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, “हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर.” 5 परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. 6 परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. 7 हे माझ्या जिवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. 8 तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत. 9 जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. 10 “मी फार पीडित आहे,” असे मी म्हणतो; तरी देवावर माझी श्रद्धा आहे. 11 मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.” 12 परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ? 13 मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. 14 परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. 15 परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. 16 हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे; मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे; तू माझी बंधने सोडली आहेत. 17 मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. 18 परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. 19 परमेश्वराच्या घराच्या अंगणात, हे यरुशलेमा, तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेशाचे स्तवन करा!1 |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India