Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 115 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देव आणि मूर्ती

1 हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस.

2 “ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे?

3 आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो.

4 त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.

5 त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही;

6 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; त्यांना नाक आहे पण वास येत नाही;

7 त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही.

8 त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.

9 हे इस्राएला, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.

10 हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.

11 अहो परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.

12 परमेश्वराने आमची आठवण केली आहे; तो आशीर्वाद देईल, इस्राएलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल.

13 परमेश्वराचे भय धरणार्‍या लहानथोरांना तो आशीर्वाद देईल.

14 परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो.

15 आकाश व पृथ्वी ही निर्माण करणार्‍या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो.

16 स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.

17 मेलेले म्हणजे निःशब्दस्थानी उतरलेले कोणीही परमेशाचे स्तवन करीत नाहीत;

18 पण आम्ही येथून पुढे सर्वकाळ परमेशाचा धन्यवाद करीत राहू. परमेशाचे स्तवन करा!1

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan