स्तोत्रसंहिता 111 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो 1 परमेशाचे स्तवन करा!1 सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन. 2 परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात. 3 त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते. 4 आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे; परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे. 5 त्याने आपले भय धरणार्यांना अन्न दिले आहे; तो आपला करार सदा स्मरतो. 6 त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे. 7 त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. 8 ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहेत. 9 त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे; त्याने आपला करार सर्वकाळचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. 10 परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्वकाळ चालते. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India