स्तोत्रसंहिता 101 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)नीतीने वागण्याची प्रतिज्ञा दाविदाचे स्तोत्र. 1 दया व न्याय ह्यांविषयी मी गाईन; हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन, 2 मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. 3 मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही. 4 हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल; मी वाइटाशी परिचय ठेवणार नाही. 5 आपल्या शेजार्याची गुप्तपणे चहाडी करणार्याचा मी विध्वंस करीन; जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. 6 देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. 7 कपट करणार्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही; असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. 8 देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्या सर्वांचा उच्छेद होईल. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India