नीतिसूत्रे 8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)ज्ञानाची थोरवी 1 ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? 2 मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, चवाठ्यांवर ते उभे असते; 3 ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, 4 “मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे. 5 अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. 6 ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. 7 माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. 8 माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही. 9 ज्याला समज आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांना सरळ आहेत 10 रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. 11 कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणार्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत; 12 मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत. 13 परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते. 14 मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे. 15 माझ्या साहाय्याने राजे राज्य करतात. अधिपती न्याय ठरवतात. 16 माझ्या साहाय्याने अधिपती, सरदार, व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवतात. 17 माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते. 18 संपत्ती व मान, टिकणारे धन व न्यायत्व, ही माझ्या हाती आहेत. 19 माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे; माझी प्राप्ती उत्कृष्ट रुप्यापेक्षा उत्तम आहे. 20 मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते; 21 माझ्यावर प्रीती करणार्यांना मी संपत्ती प्राप्त करून देते, त्यांची भांडारे भरते. 22 परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य, असे मला निर्माण केले. 23 अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. 24 जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. 25 पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले; 26 त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती. 27 त्याने आकाशे स्थापली तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली; 28 जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले; 29 जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली; जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले; 30 तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; 31 त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे. 32 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत; 33 बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. 34 जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य. 35 कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते; 36 परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानी करून घेतो; जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India