Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

नीतिसूत्रे 27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही.

2 स्वमुखाने नव्हे, तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.

3 दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग ह्या दोहोंहून भारी असतो.

4 क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल?

5 झाकलेल्या प्रेमापेक्षा, उघड शब्दताडन बरे.

6 मित्राने केलेले घाय खर्‍या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवतो.

7 तृप्त जिवाला मधाचा वीट येतो, पण भुकेल्या जिवाला कोणताही कडू पदार्थ गोड लागतो.

8 स्वस्थान सोडून भ्रमण करणारा मनुष्य आपले कोटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे.

9 तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणार्‍या मित्राचे माधुर्य होय.

10 स्वत:च्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नकोस; आपल्या संकटसमयी भावाच्या दारी जाऊ नकोस; दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा.

11 माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणार्‍यास मी प्रत्युत्तर देईन.

12 चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.

13 अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे; जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणादाखल ठेव.

14 कोणी मोठ्या पहाटेस उठून उंच स्वराने आपल्या मित्रास आशीर्वाद दिला, तर तो त्याला शाप होय असे मानतील.

15 पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारे ठिपके, व कटकटी बायको ही सारखीच आहेत;

16 तिला आवरणारा म्हणजे वार्‍याला आवरणारा होय; त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते.

17 तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो.

18 जो अंजिराचे झाड राखतो तो त्याचे फळ चाखतो; जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो.

19 जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते तशी मनुष्यांची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत.

20 अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.

21 रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय.

22 कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही.

23 तू आपल्या शेरडामेंढरांची स्थिती पाहत जा; आपल्या कळपांवर चांगली नजर ठेव;

24 कारण संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय?

25 वाळलेले गवत जाऊन त्या जागी कोवळे गवत उगवते, डोंगरांवरील हिरवळ कापून गोळा करतात.

26 वस्त्रांसाठी कोकरे आहेत; बकर्‍या शेताचे मोल आहेत;

27 तुझ्या व तुझ्या घराण्याच्या अन्नापुरते, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते शेळ्यांचे दूध तुझ्याजवळ आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan