Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

नीतिसूत्रे 24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दुर्जनांचा हेवा करू नकोस, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस.

2 त्यांचे अंत:करण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात.

3 सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते;

4 ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात.

5 सुज्ञ पुरुष बलवान असतो; ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करतो.

6 शहाणपणाने व्यवस्था करून युद्ध चालव; बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते.

7 ज्ञान मूर्खाच्या आटोक्याबाहेर असते; वेशीवर तो आपले तोंड उघडीत नाही.

8 जो दुष्कर्म करण्याचे योजतो, त्याला लोक घातकी माणूस म्हणतात.

9 मूर्खाचा विचार पापरूप असतो; निंदकाचा लोकांना वीट येतो.

10 संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय.

11 ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर.

12 “आम्हांला हे ठाऊक नव्हते” असे म्हणशील तर हृदये तोलून पाहणार्‍याला हे कळत नाही काय? तुझा जीव राखणार्‍याला माहीत नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय?

13 माझ्या मुला, मध खा, तो चांगला आहे, मधाचे पोळे खा; ते तुझ्या जिभेला गोड लागते;

14 असेच ज्ञान तुझ्या जिवाला आहे असे समज; ते तुला प्राप्त झाले तर फलप्राप्ती घडेल; तुझी आशा खुंटणार नाही.

15 अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस;

16 कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.

17 तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नकोस, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये;

18 उल्लासले तर ते परमेश्वर पाहील आणि त्याला ते आवडणार नाही आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवील.

19 दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; दुर्जनांचा मत्सर करू नकोस.

20 कारण दुष्कर्म्यास चांगली गती नाही; दुर्जनांचा दीप मालवेल.

21 माझ्या मुला, परमेश्वराचे व राजाचे भय बाळग. जे चंचल वृत्तीचे आहेत त्यांच्यात मिसळू नकोस;

22 कारण त्यांच्यावर विपत्ती अचानक येईल, आणि त्यांच्या आयुष्याचा क्षय केव्हा होईल कोण जाणे?

23 हीही सुज्ञाची वचने आहेत. तोंड पाहून न्याय करणे ठीक नाही.

24 “तू नीतिमान आहेस” असे जो दुर्जनास म्हणतो, त्याला लोक शाप देतील, राष्ट्रे त्याचा तिटकारा करतील;

25 पण जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यांना चांगला आशीर्वाद मिळेल.

26 जो योग्य उत्तर देतो तो जणू काय ओठांचे चुंबन देतो.

27 तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.

28 आपल्या शेजार्‍याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नकोस; तू आपल्या वाणीने ठकवू नकोस.

29 “मी जशास तसे करीन, त्याचे उसने फेडीन,” असे म्हणू नको.

30 एकदा मी आळशाच्या शेताजवळून, बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो;

31 तेव्हा तो काटेर्‍यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले.

32 ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला.

33 “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो,”

34 असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan