Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


वल्हांडण सण पाळण्याविषयी नियम

1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनाय रानात मोशेला म्हणाला,

2 “नेमलेल्या समयी इस्राएल लोकांनी वल्हांडण सण पाळावा.

3 ह्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी नेमलेल्या समयी त्याच्यासंबंधाचे सर्व विधी व सर्व नियम ह्यांना अनुसरून तुम्ही तो पाळावा.”

4 मग मोशेने इस्राएल लोकांना वल्हांडण सण पाळायला सांगितले.

5 त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी सीनाय रानात वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

6 एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते, त्यांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना, म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे आले;

7 ते मोशेला म्हणाले, “एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहोत तर इस्राएल लोकांबरोबर नेमलेल्या समयी परमेश्वराला अर्पण आणण्याची आम्हांला का मनाई असावी?”

8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा; तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो.”

9 परमेश्वर मोशेला म्हणाला,

10 “इस्राएल लोकांना सांग की, तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजांतला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावा.

11 दुसर्‍या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशू खावा;

12 त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये; वल्हांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा.

13 परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी.

14 तुमच्यामध्ये राहणार्‍या कोणा परदेशीयाला परमेश्वरा-प्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायची इच्छा असली तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यांना अनुसरून तो पाळावा. स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा.”


निवासमंडपावरील मेघ
( निर्ग. 40:34-38 )

15 ज्या दिवशी निवासमंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली; संध्याकाळी तो निवासमंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला.

16 असे नित्य होत असे; दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे.

17 जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत.

18 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत; निवासमंडपावर जितके दिवस मेघ राही तितके दिवस ते तळ देऊन राहत.

19 मेघ निवासमंडपावर बरेच दिवस राहिला तरी इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत असत व कूच करीत नसत.

20 कधी कधी मेघ थोडेच दिवस निवासमंडपावर असे. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत.

21 कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हलला म्हणजे ते कूच करीत; दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत.

22 मेघ निवासमंडपावर छाया करून दोन दिवस, एक महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत; तो वर गेला म्हणजे ते कूच करीत.

23 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवत; परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे ते परमेश्वराचा नियम पाळत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan