Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


वारसा हक्क असणार्‍या मुलींच्या लग्नांसंबंधी नियम

1 मग योसेफ वंशाच्या कुळांपैकी गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याच्या वंशातील पितृकुळाचे प्रमुख पुरुष मोशेकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांच्या पितृकुळांच्या सरदारांना म्हणाले,

2 “परमेश्वराने आमच्या स्वामीला आज्ञा केली होती की, इस्राएल लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटून द्यावा; परमेश्वराने आमच्या स्वामीला आणखी अशी आज्ञा केली होती की, आमचा बंधू सलाफहाद ह्याच्या वतनाचा हिस्सा त्याच्या मुलींना द्यावा.

3 पण इस्राएल लोकांच्या इतर कोणत्याही वंशातल्या पुरुषांशी त्याचा विवाह झाला तर आमच्या वाडवडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा कमी होईल आणि ज्या वंशात त्या जातील त्या वंशाच्या वतनात तो मिळवला जाईल, आणि आमच्या हिश्शाच्या वतनातून तो कमी होईल.

4 मग इस्राएल लोकांचे योबेलवर्ष आल्यावरही ज्या वंशात त्या गेल्या असतील त्याच्या वतनात तो मिळवला जाईल; अशाने त्यांचे वतन आमच्या वाडवडिलांच्या वंशाच्या वतनातून कमी होईल.”

5 तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली की, “योसेफाचे वंशज म्हणतात ते बरोबर आहे.

6 सलाफहादाच्या मुलींसंबंधाने परमेश्वराने अशी आज्ञा केली आहे की, ‘त्यांना आवडेल त्याच्याशी त्यांनी विवाह करावा, पण आपल्या बापाच्या वंशाच्या कुळातच त्यांनी विवाह करावा.’

7 इस्राएल लोकांचे वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांतील प्रत्येकाने आपल्या बापाच्या वंशाच्या वतनाला चिकटून राहावे.

8 इस्राएल लोकांच्या कोणत्याही वंशातील कोणत्याही मुलीला वतन मिळालेले असेल तर तिचा विवाह तिच्या बापाच्या वंशाच्या कुळातल्या मुलाशीच व्हावा; अशाने इस्राएल लोकांतील प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांचे वतन मिळेल.

9 कोणतेही वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे.”

10 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सलाफहादाच्या मुलींनी केले;

11 सलाफहादाच्या मुली महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ ह्यांनी आपल्या चुलत भावांशी विवाह केला.

12 योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले.

13 मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशेच्या द्वारे परमेश्वराने जे नियम व विधी इस्राएल लोकांना लावून दिले ते हे होत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan