Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मिद्यान्यांवर सूड घेणे आणि लुटीचे शुद्धीकरण

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,

2 “इस्राएल लोकांच्या वतीने मिद्यान्यांचा सूड घे; त्यानंतर तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.”

3 त्याप्रमाणे मोशे लोकांना म्हणाला, “युद्धासाठी तुमच्यातल्या पुरुषांना सशस्त्र करा म्हणजे ते मिद्यानावर चढाई करून परमेश्वराच्या वतीने मिद्यानाचा सूड घेतील.

4 इस्राएलाच्या सर्व वंशांतून, प्रत्येक वंशामागे एकेक हजार पुरुष युद्धासाठी पाठवा.”

5 ह्याप्रमाणे इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांतून प्रत्येक वंशामागे एक हजार असे बारा हजार सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले.

6 मोशेने प्रत्येक वंशातले एक हजार पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याजकाचा मुलगा फीनहास ह्याला लढाईला पाठवले; आणि पवित्रस्थानातली पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाली केली.

7 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी मिद्यानाशी लढून एकूणएक पुरुषाची कत्तल केली.

8 मारण्यात आलेल्या ह्या पुरुषांबरोबर त्यांनी अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्या मिद्यानाच्या पाच राजांचाही वध केला; त्यांनी बौराचा मुलगा बलाम ह्यालाही तलवारीने मारले.

9 शिवाय इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रिया व मुलेबाळे ह्यांना कैद केले; आणि त्यांची सर्व गुरेढोरे, सर्व शेरडेमेंढरे आणि सर्व मालमत्ता लुटली.

10 त्यांच्या वस्तीची सर्व नगरे आणि त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या.

11 मग सारी लूट, सर्व पाडाव केलेली माणसे आणि जनावरे त्यांनी बरोबर घेतली.

12 आणि यरीहोजवळ यार्देनेतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, एलाजार याजक आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांनी ते बंदिवान, धरलेली जनावरे व लूट आणली.

13 तेव्हा मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सर्व सरदार छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले.

14 जे सहस्रपती, शतपती इत्यादी सेनापती युद्धाहून परत आले होते त्यांच्यावर मोशे रागावला.

15 मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व स्त्रिया जिवंत ठेवल्या काय?

16 पाहा, पौराच्या प्रकरणी इस्राएल लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली त्याला ह्याच स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली.

17 तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका.

18 पण ज्या मुलींनी पुरुषांशी संग केलेला नाही त्या सर्व आपणांसाठी जिवंत ठेवा.

19 सात दिवस तुम्ही छावणीबाहेर तळ देऊन राहा; तुमच्यापैकी ज्यांनी एखाद्याला जिवे मारले असेल आणि ज्यांना मारलेल्याचा स्पर्श झाला असेल तितक्यांनी तिसर्‍या व सातव्या दिवशी स्वतःला व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.

20 प्रत्येक वस्त्र, चामड्याची प्रत्येक वस्तू, बकर्‍याच्या केसांची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे.”

21 मग एलाजार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा होय :

22 सोने, चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे वगैरे

23 जे काही अग्नीत टिकण्याजोगे असेल ते अग्नीत टाकून काढले म्हणजे शुद्ध होईल; तरीपण ते अशौचक्षालनाच्या पाण्यानेही शुद्ध करावे, जे काही अग्नीत टिकण्याजोगे नसेल ते पाण्यात घालून काढावे.

24 सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत आणि शुद्ध होऊन छावणीत यावे.”


लुटीची वाटणी

25 परमेश्वर मोशेला म्हणाला,

26 “तू एलाजार याजक आणि मंडळीतील पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख मिळून लुटून आणलेल्या माणसांची व जनावरांची मोजदाद करा.

27 त्या लुटीचे दोन भाग करावेत; एक भाग युद्धास गेलेल्या योद्ध्यांना द्यावा, व दुसरा भाग इतर सर्व मंडळीला द्यावा.

28 युद्धास गेलेल्या योद्ध्याच्या हिश्शातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक ह्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा;

29 त्यांच्या हिश्शातून तो घेऊन परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश म्हणून एलाजार याजकाला द्यावा.

30 मग इस्राएल लोकांना मिळालेल्या हिश्शातून माणसे आणि गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशू ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्‍या लेव्यांना द्यावे.”

31 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व एलाजार याजक ह्यांनी केले.

32 सैन्यातील शिपायांनी लुटून घेतलेल्या वस्तूंखेरीज सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे,

33 बहात्तर हजार गाईबैल,

34 एकसष्ट हजार गाढवे,

35 आणि माणसांपैकी ज्यांनी पुरुषांशी संग केला नव्हता अशा बत्तीस हजार स्त्रिया एवढी ती लूट होती.

36 युद्धास गेलेल्यांच्या वाट्याला ह्या लुटीचा अर्धा भाग आला त्यात तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेरडेमेंढरे होती;

37 त्यांपैकी सहाशे पंचाहत्तर ही परमेश्वराचा कर होती.

38 गाईबैल छत्तीस हजार असून त्यांतील बहात्तर हे परमेश्वराचा कर होते.

39 गाढवे तीस हजार पाचशे असून त्यांतील एकसष्ट ही परमेश्वराचा कर होती.

40 माणसे सोळा हजार असून त्यांतील बत्तीस ही परमेश्वराचा कर होती.

41 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने एलाजार याजकाला दिला.

42 युद्धास गेलेल्या पुरुषांखेरीज इतर इस्राएल लोकांच्या वाट्याला आलेला अर्धा भाग मोशेने बाजूला काढला होता तो ह्याप्रमाणे :

43 तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेरडेमेंढरे,

44 छत्तीस हजार गाईबैल,

45 तीस हजार पाचशे गाढवे,

46 आणि सोळा हजार माणसे.

47 मंडळीला मिळालेल्या हिश्शातून मोशेने माणसे व जनावरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्‍या लेव्यांना दिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.

48 मग हजारो सैनिकांवर असलेले सेनापती म्हणजे सहस्रपती आणि शतपती मोशेकडे येऊन म्हणाले,

49 “जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदाद तुझ्या दासांनी केली आहे; त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही;

50 म्हणून आम्हा प्रत्येकाला जे सोन्याचे दागिने मिळाले, म्हणजे तोडे, कडी, अंगठ्या, कुंडले व बाजूबंद ही आम्ही आमच्या जिवांबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून परमेश्वराला अर्पण करायला आणली आहेत.”

51 तेव्हा मोशे व एलाजार याजक ह्यांनी ते सोने म्हणजे सर्व जडावाचे दागिने त्यांच्यापासून स्वीकारले.

52 सहस्रपती व शतपती ह्यांनी परमेश्वराला समर्पण केलेले सर्व सोने सोळा हजार सातशे पन्नास शेकेल भरले.

53 ह्या योद्ध्यांनी आपापल्यासाठी ही लूट मिळवली होती.

54 मोशे व एलाजार याजक ह्यांनी हे सोने सहस्रपती व शतपती ह्यांच्यापासून घेऊन इस्राएल लोकांच्या प्रीत्यर्थ परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपात नेऊन ठेवले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan