गणना 26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मवाब देशात इस्राएल लोकांची शिरगणती 1 मरी येऊन गेल्यावर परमेश्वर मोशेला आणि अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला म्हणाला, 2 “इस्राएलात जे वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील, त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्या सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीची गणती करा.” 3 त्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजक हे यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना म्हणाले की, 4 “मिसर देशातून मोशे व इस्राएल लोक आले होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही वीस वर्षांच्या किंवा त्यांहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा.” 5 इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन; रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : हनोख ह्याचे हनोखी कूळ; पल्लू ह्याचे पल्लूवी कूळ; 6 हेस्रोन ह्याचे हेस्रोनी कूळ; कर्मी ह्यांचे कर्मी कूळ; 7 ही रऊबेनी कुळे; त्यांची गणती केली ती त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली. 8 पल्लूचा मुलगा अलीयाब; 9 अलीयाबचे मुलगे नमुवेल, दाथान व अबीराम. हे दाथान व अबीराम मंडळीतले निवडक पुरुष होते. कोरहाच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा ह्यांनी त्या टोळीत सामील होऊन मोशे व अहरोन ह्यांना विरोध केला होता; 10 ज्या वेळी ती अडीचशे पुरुषांची टोळी अग्नीत भस्म होऊन मरण पावली त्या वेळी पृथ्वीने आपले तोंड उघडून कोरहाबरोबर त्यांनाही गिळून टाकले, व ते चिन्हादाखल झाले. 11 तरीपण कोरहाचे मुलगे मेले नव्हते. 12 शिमोनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : नमुवेलाचे नमुवेली कूळ; यामीनाचे यामीनी कूळ; 13 जेरहाचे जेरही कूळ; शौलाचे शौली कूळ; 14 ही शिमोनी कुळे; ह्यांचे बावीस हजार दोनशे लोक भरले. 15 गादाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : सफोनाचे सफोनी कूळ; हग्गीचे हग्गी कूळ; शूनीचे शूनी कूळ; 16 आजनीचे आजनी कूळ; एरीचे एरी कूळ; 17 अरोदाचे अरोदी कूळ; अरेलीचे अरेली कूळ; 18 ही गादी कुळे; ह्यांची गणती केली ती चाळीस हजार पाचशे भरली. 19 एर व ओनान हे यहूदाचे मुलगे होते. एर व ओनान कनान देशात मरण पावले. 20 यहूदाच्या इतर मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शेला ह्याचे शेलानी कूळ; पेरेसाचे पेरेसी कूळ; जेरहाचे जेरही कूळ; 21 पेरेसाच्या वंशजांची कुळे ही : हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ; हामूलाचे हामूली कूळ; 22 ही यहूदाची कुळे; ह्यांची गणती केली ती शहात्तर हजार पाचशे भरली. 23 इस्साखाराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : तोला ह्याचे तोलाई कूळ, पूवा ह्याचे पूवी कूळ; 24 याशूबाचे याशूबी कूळ; शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ. 25 ही इस्साखाराची कुळे; ह्यांची गणती केली ती चौसष्ट हजार तीनशे भरली. 26 जबुलूनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : सेरेदाचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ; याहलेलाचे याहलेली कूळ; 27 ही जबुलूनाची कुळे; ह्यांची गणती केली ती साठ हजार पाचशे भरली. 28 योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांच्यापासून जी कुळे निर्माण झाली ती ही : 29 मनश्शेचे वंशज हे : माखीराचे माखीरी कूळ; माखीराला गिलाद झाला; गिलादाचे गिलादी कूळ. 30 गिलादाचे वंशज हे : इयेजेराचे इयेजेरी कूळ; हेलेकाचे हेलेकी कूळ; 31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ; शेखेमाचे शेखेमी कूळ; 32 शमीदा ह्याचे शमीदाई कूळ व हेफेराचे हेफेरी कूळ. 33 हेफेराचा मुलगा सलाफहाद ह्याला मुलगे नव्हते; मुली मात्र होत्या; आणि सलाफहादाच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. 34 ही मनश्शेची कुळे; ह्यांची गणती केली ती बावन्न हजार सातशे भरली. 35 एफ्राइमाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूथेलाहाचे शूथेलाही कूळ, बेकेराचे बेकेरी कूळ; व तहनाचे तहनी कूळ; 36 शूथेलाहाचे वंशज हे : एरानाचे एरानी कूळ; 37 ही एफ्राइमाच्या वंशजांची कुळे; ह्यांची गणती केली ती बत्तीस हजार पाचशे भरली. आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत. 38 बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : बेला ह्याचे बेलाई कूळ, अशबेलाचे अशबेली कूळ; अहीरामाचे अहीरामी कूळ; 39 शफूफामाचे शफूफामी कूळ; हूफामाचे हूफामी कूळ; 40 बेला ह्याचे मुलगे अर्द व नामान हे होते. अर्दाचे अर्दी कूळ; नामानाचे नामानी कूळ. 41 आपापल्या कुळांप्रमाणे हे बन्यामिनाचे वंशज होत. त्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार सहाशे भरली. 42 दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शूहामाचे शूहामी कूळ. ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. 43 सगळ्या शूहामी कुळांची गणती केली ती चौसष्ट हजार चारशे भरली. 44 आशेराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : इम्ना ह्याचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ; बरीया ह्याचे बरीयाई कूळ. 45 बरीयाच्या वंशजांतल्या हेबेराचे हेबेरी कूळ व मलकीएलाचे मलकीएली कूळ. 46 आशेराच्या मुलीचे नाव सेराह होते. 47 ही आशेराच्या मुलांची कुळे; ह्यांची गणती केली ती त्रेपन्न हजार चारशे भरली. 48 नफतालीच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ; 49 येसेराचे येसेरी कूळ व शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ. 50 ही नफतालीची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. ह्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार चारशे भरली. 51 इस्राएल लोकांची गणती झाली, ती सहा लक्ष एक हजार सातशे तीस भरली. चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी 52 परमेश्वर मोशेला म्हणाला, 53 “ह्यांच्या लोकसंख्येप्रमाणे देशाचे वतन ह्यांच्यामध्ये द्यायचे आहे. 54 अधिक संख्येच्या वंशांना अधिक वाटा द्यावा व कमी संख्येच्या वंशांना कमी वाटा द्यावा; प्रत्येक वंशाला त्याच्या-त्याच्या संख्येप्रमाणे वतन द्यावे; 55 पण चिठ्ठ्या टाकून जमीन वाटण्यात यावी; त्यांच्या वाडवडिलांच्या वंशांच्या नावांप्रमाणे त्यांना वाटा मिळावा. 56 ते संख्येने अधिक असोत किंवा कमी असोत, त्यांची वतने चिठ्ठ्या टाकून वाटण्यात यावीत. लेव्यांची कुळे 57 लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ. 58 लेव्यांची कुळे : लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ व कोरही कूळ. कहाथाला अम्राम झाला. 59 अम्रामाच्या स्त्रीचे नाव योखबेद होते; ती लेवीची मुलगी होती; ती त्याला मिसर देशात झाली होती. तिला अम्रामापासून अहरोन व मोशे आणि त्यांची बहीण मिर्याम ही झाली. 60 अहरोनाला नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे झाले. 61 नादाब व अबीहू ह्यांनी परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी नेला तेव्हा ते ठार झाले. 62 लेव्यांपैकी एक महिन्याच्या व त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली, ते तेवीस हजार भरले; इस्राएल लोकांबरोबर त्यांची गणती केली नव्हती; कारण त्यांना इस्राएल लोकांबरोबर वतन दिले नव्हते. पहिल्या शिरगणतीतले कालेब व यहोशवा मात्र हयात 63 मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी इस्राएल लोकांची गणती केली ती इतकी भरली. 64 सीनाय रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती तिच्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता. 65 कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India