Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


कोरह, दाथान व अबीराम ह्यांचे बंड

1 कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रऊबेन वंशातील अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि ओन बिन पेलेथ

2 हे इस्राएलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले; हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते.

3 ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, “तुमचे आता फारच झाले! सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याठायी आहे; तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता?”

4 हे ऐकून मोशे पालथा पडला;

5 मग तो कोरह व त्याचे साथीदार ह्यांना म्हणाला, “परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल; ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल.

6 आता असे करा. कोरहा, तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणी आणा;

7 आणि उद्या त्यांत अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा; मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल; लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले.”

8 तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो ऐका;

9 तुम्ही परमेश्वराच्या निवासमंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आपल्याजवळ येऊ दिले; ह्या कार्यासाठी इस्राएलाच्या देवाने तुम्हांला इस्राएल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे हे काय थोडे झाले?

10 तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंदांना परमेश्वराने आपल्याजवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय?

11 ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात, हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्याविरुद्ध कुरकुर करावी?”

12 मोशेने अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांना बोलावणे पाठवले; पण ते म्हणाले, “आम्ही येत नाही;

13 दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशातून काढून तू आम्हांला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणलेस हे काय थोडे झाले म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवतोस?

14 शिवाय, दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात तू आम्हांला मुळीच आणलेले नाहीस अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हांला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यांत तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही.”

15 तेव्हा मोशेचा कोप भडकला. तो परमेश्वराला म्हणाला, “त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस; मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही.”

16 मग मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तू आपल्या सार्‍या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो; तू, ते व अहरोन

17 तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला; प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे दोनशे पन्नास धुपाटणी परमेश्वरासमोर आणावीत; तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे.”

18 तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेवला व त्यावर धूप घातला, आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शनमंडपाच्या दाराजवळ उभे राहिले.

19 कोरहाने त्यांच्याविरुद्ध सगळी मंडळी दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमवली, तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले.

20 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,

21 “तुम्ही ह्या मंडळीतून वेगळे व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करतो.”

22 तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”

23 मग परमेश्वर मोशेला म्हणाला,

24 “मंडळीला सांग की, तुम्ही कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या निवासस्थानापासून निघून जा.”

25 तेव्हा मोशे उठून दाथान व अबीराम ह्यांच्याकडे गेला आणि इस्राएल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले.

26 तो मंडळीला म्हणाला, “तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल.”

27 मग ते कोरह, दाथान व अबीराम ह्यांच्या डेर्‍याजवळून निघून गेले; आणि दाथान व अबीराम बाहेर निघाले व आपली बायकामुले व तान्ही बाळे ह्यांच्यासह आपल्या तंबूंच्या दाराजवळ उभे राहिले.

28 तेव्हा मोशे म्हणाला, “मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत, तर ती करायला परमेश्वराने मला पाठवले आहे हे तुम्हांला दिसून येईल.

29 इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्यांचे पारिपत्य झाले तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा.

30 पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडवली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की, ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे.”

31 हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली.

32 आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली.

33 ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले.

34 ‘पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील’ असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्राएल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले.

35 मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्‍या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.

36 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,

37 “अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला सांग की धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत व तो अग्नी विखरून टाक.

38 पाप करून आपल्या जिवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे पवित्र आहेत; ह्या प्रकारे ती इस्राएल लोकांना ताकीद दिल्याची चिन्हे होतील.”

39 जी पितळेची धुपाटणी अग्नीने भस्म झालेल्या त्या पुरुषांनी अर्पण केली होती, ती घेऊन एलाजार याजकाने त्यांचे पत्रे ठोकले व वेदी मढवली;

40 ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये.

41 दुसर्‍या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, “तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकले आहे.”

42 मंडळीतील लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शनमंडपाकडे नजर टाकली तेव्हा त्यावर मेघाने छाया केली असून परमेश्वराचे तेज प्रकट झाले आहे असे त्यांना दिसले.

43 हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपासमोर गेले.

44 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला,

45 “तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो.” हे ऐकून ते पालथे पडले.

46 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून ते ताबडतोब मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे.”

47 मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडे गेला आणि लोकात मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्‍चित्त केले.

48 मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली.

49 कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्याव्यतिरिक्त मरीने चौदा हजार सातशे ऐंशी लोक मेले.

50 मरी थांबल्यावर अहरोन दर्शनमंडपाच्या दाराकडे मोशेजवळ परत आला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan