गणना 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)बारा हेरांची कनान देशास रवानगी ( अनु. 1:19-33 ) 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “मी इस्राएल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव; त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एकेक पुरुष पाठव; प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. 3 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले; ते सगळे पुरुष इस्राएल लोकांचे प्रमुख होते. 4 त्यांची नावे ही : रऊबेन वंशातला जक्कूराचा मुलगा शम्मूवा; 5 शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट, 6 यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, 7 इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल, 8 एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा, 9 बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी, 10 जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गाद्दीयेल, 11 योसेफ वंशातला, अर्थात मनश्शे वंशातला सूसीचा मुलगा गाद्दी, 12 दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल. 13 आशेर वंशातला मीखाएलाचा मुलगा सतूर, 14 नफताली वंशातला वाप्सीचा मुलगा नहब्बी, 15 आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल. 16 देश हेरायला मोशेने जे पुरुष पाठवले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेवले. 17 मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवताना सांगितले की, “येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा; 18 आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, 19 ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत, 20 तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडेझुडपे आहेत की नाहीत हे पाहून या. हिम्मत धरा, व त्या देशातली काही फळे घेऊन या.” ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते. 21 मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला. 22 ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते. 23 तेथून ते अष्कोल नाल्यापर्यंत आले; तेथे त्यांनी द्राक्षांच्या एका घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा माणसांनी काठीवर घालून नेली; त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजीरेही घेतली. 24 इस्राएल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्याचे नाव ‘अष्कोल (म्हणजे घोस) नाला’ असे पडले. 25 देश हेरून ते चाळीस दिवसांनी परत आले. 26 ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्राएलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकिकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली. 27 ते मोशेला म्हणाले की, “ज्या देशात तू आम्हांला पाठवले त्या देशात आम्ही गेलो; त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत; तेथली ही फळे पाहा. 28 त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. 29 नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.” 30 तेव्हा मोशेसमोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, “आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ; कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत.” 31 पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत.” 32 त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्राएल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली; ते म्हणाले, “जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे; तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. 33 तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India