Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

नहेम्या 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


नहेम्याला यरुशलेमेस पाठवण्यात येते

1 अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. ह्यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो.

2 राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे.” तेव्हा मी फार भ्यालो.

3 मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?”

4 राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली,

5 आणि राजाला म्हटले, “महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असलात तर यहूदा देशात, माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा म्हणजे मी ते बांधीन.”

6 राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, “तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील?” नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्याला कळवली.

7 मग मी राजाला म्हणालो, “महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहूदा देशात पोहचेपर्यंत महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावांवर मला पत्रे द्यावीत;

8 आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ ह्याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी तुळया काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली.

9 मग मी महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताधिपतींकडे जाऊन त्यांना राजाची फर्माने दिली. राजाने माझ्याबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठवले होते.

10 कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.


कोट बांधण्यास नहेम्या लोकांना प्रोत्साहन देतो

11 मी यरुशलेमेस जाऊन पोहचल्यावर तेथे तीन दिवस होतो.

12 मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली; यरुशलेमेसंबंधाने काय करावे ह्याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्याला सांगितला नाही, आणि माझ्या बसायच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते.

13 मी रात्री खोरेवेशीने बाहेर पडून अजगराच्या झर्‍याकडे, व उकिरडावेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळाल्या होत्या त्यांची पाहणी केली.

14 मग मी तसाच पुढे झरावेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती.

15 तेव्हा मी रात्री ओहोळाच्या वाटेने वर चढून कोट लक्षपूर्वक पाहिला; मग मागे वळून खोरेवेशीने परत आत आलो.

16 मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारांना ठाऊक नव्हते; मी अद्यापि यहूदी, याजक, अमीर-उमराव, शास्ते व वरकड कामकरी ह्यांतल्या कोणालाही काहीएक सांगितले नव्हते.

17 मग मी त्यांना म्हणालो, “आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हांला दिसतच आहे; यरुशलेम उजाड झाले आहे, व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत; तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही.”

18 माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले, व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू.” तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली.

19 हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”

20 मी त्यांना उत्तर दिले की, “स्वर्गीचा देव आम्हांला यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कंबर कसून हे बांधणार; पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा स्मारक राहणार नाही.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan