Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

नहूम 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सूड घेणारा परमेश्वराचा क्रोध

1 निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.

2 परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे; परमेश्वर आपल्या विरोध्यांचे पारिपत्य करणारा आहे; तो आपल्या शत्रूंविषयी मनात क्रोध वागवतो.

3 परमेश्वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो पाप्यांना शासन केल्यावाचून राहणार नाही; परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत.

4 तो समुद्रास दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो; बाशान व कर्मेल त्याच्यापुढे म्लान होतात, लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.

5 त्याच्यापुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात; त्याच्यापुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्यांवरील सर्व रहिवासी थडथड उडतात.

6 त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.

7 परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो.

8 तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना अंधारात उधळून लावील.

9 परमेश्वराविषयी तुम्हांला काय वाटते?1 तो पुरापुरा अंत करील; विपत्ती दुसर्‍यांदा येणे नकोच.

10 ते गुंतागुंत झालेल्या काटेर्‍यांसारखे असले, ते द्राक्षारसाने मस्त झालेल्यांप्रमाणे असले, तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.

11 परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यातून निघाला आहे.

12 परमेश्वर म्हणतो, “ते मजबूत व असंख्य असले, तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाहीतसे होतील. मी तुला पिडले, पण आता पुढे पिडणार नाही.

13 आता मी तुझ्यावरील त्याचे जूं मोडीन, तुझी बंधने तोडून टाकीन.”

14 परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की, “तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही; तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन; मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस.”


निनवेच्या पतनाचे वर्तमान

15 शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan