Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मार्क 15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


रोमन सुभेदार पिलातासमोर येशू

1 मग पहाट होताच वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले.

2 तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.”

3 मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवत होते.

4 पिलाताने त्याला पुन्हा विचारले, “काय? तू काही उत्तर देत नाहीस? पाहा, ते तुझ्यावर किती आरोप ठेवत आहेत.”

5 तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; ह्यावरून पिलाताला आश्‍चर्य वाटले.

6 सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे.

7 तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर बांधून ठेवलेला बरब्बा नावाचा कोणीएक माणूस होता.

8 लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.”

9 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्याकरता मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”

10 कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले.

11 परंतु त्याला सोडण्याऐवजी ‘बरब्बाला आमच्यासाठी सोडा’ अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले.

12 तेव्हा पिलाताने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे?”

13 “त्याला वधस्तंभावर खिळून टाका,” अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली.

14 पिलाताने त्यांना म्हटले, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”

15 तेव्हा लोकसमुदायाला खूश करावे ह्या हेतूने पिलाताने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले, आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.


शिपाई येशूची थट्टा करतात

16 मग शिपायांनी त्याला प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली.

17 नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढवले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला.

18 आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो.”

19 त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले; ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले.

20 अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळे वस्त्र काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले, आणि वधस्तंभावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले.


येशूला वधस्तंभावर खिळतात

21 तेव्हा शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर, म्हणजे आलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप, हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले.

22 मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले.

23 आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही.

24 तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी ‘त्यांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले.’

25 त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.

26 ‘यहूद्यांचा राजा’ असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लावला होता.

27 त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.

28 [‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.]

29 मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या,

30 आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.”

31 तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसांत थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही.

32 इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती.


येशूचा मृत्यू

33 सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.

34 नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”

35 तेव्हा जवळ उभे राहणार्‍यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.”

36 आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.”

37 मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला.

38 तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.

39 मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”

40 काही स्त्रियांही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरीया व सलोमे ह्या होत्या;

41 तो गालीलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत; ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या.


येशूची उत्तरक्रिया

42 ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती; हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या आदला दिवस होता.

43 म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले; हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता.

44 तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले; आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन विचारले, “त्याला मरून बराच वेळ झाला की काय?”

45 शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले.

46 त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्याभोवती गुंडाळले; मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसवली.

47 त्याला कोठे ठेवले हे मग्दालीया मरीया व योसेची आई मरीया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan