मीखाह 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)इस्राएलाच्या नेत्यांवर ठपका 1 मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय? 2 तुम्ही बर्याचा द्वेष करता व वाइटाची आवड धरता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता व त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता; 3 तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांच्यावरचे कातडे सोलून काढतात, बहुगुण्यात टाकलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्यांप्रमाणे त्यांची हाडे मोडून तुकडे-तुकडे करतात. 4 तेव्हा ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकणार नाही; तो त्या वेळेस त्यांना पराङ्मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत. 5 जे संदेष्टे माझ्या लोकांना बहकवतात, काही चावण्यास मिळाले तर ‘कल्याण असो,’ असे जे म्हणतात व ज्याच्यापासून त्यांना चावण्यास मिळत नाही त्याच्याबरोबर लढण्याची जे तयारी करतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो. 6 ह्यामुळे तुमच्यावर रात्र गुदरून तुम्हांला दृष्टान्त होणार नाही; तुमच्यावर अंधार पडून तुम्हांला भविष्य सांगता येणार नाही; संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल. 7 द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही. 8 मी तर याकोबाला त्याचा अपराध आणि इस्राएलास त्याचे पाप दाखवण्यास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे. 9 याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका. 10 तुम्ही रक्तपात करून सीयोन व दुष्टाई करून यरुशलेम बांधता. 11 तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.” 12 म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India