मीखाह 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)गरिबांना छळणार्यांचा धिक्कार 1 जे अनर्थाचा संकल्प करतात व बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. 2 ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात. 3 म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे; त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही; तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे. 4 त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.” 5 ह्यामुळे चिठ्ठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहणार नाही. 6 “संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.” 7 अहो, ज्यांना याकोबाच्या घराण्यातले म्हणतात, ते तुम्ही लोकहो, परमेश्वराचा आत्मा कमी सहनशील आहे काय? ही त्याची कृत्ये आहेत काय? माझी वचने सरळपणे वागण्यार्यांचे बरे करत नाहीत काय? 8 तरीपण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले; जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात, त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही हिसकावून घेता. 9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालवता, त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करता. 10 उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल. 11 वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल. 12 हे याकोबा, मी तुम्हां सर्वांना निश्चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्चये जमा करीन; मी त्यांना बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन; लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपांप्रमाणे ते गजबजतील. 13 तोडफोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे; ते वेस फोडून वेशीतून पार निघून गेले; त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India