Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मत्तय 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा मृत्यू

1 त्या वेळी मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली,

2 आणि आपल्या सेवकांना म्हटले, “हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे म्हणून ह्याच्या ठायी अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहे.”

3 कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते;

4 कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही.”

5 आणि तो त्याला जिवे मारण्यास पाहत असूनही लोकांना भीत होता, कारण ते त्याला संदेष्टा मानत असत.

6 नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले.

7 त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, “जे काही तू मागशील ते मी तुला देईन.”

8 मग तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शीर तबकात घालून मला येथे आणून द्या.”

9 तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते देण्याची आज्ञा केली;

10 आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला.

11 मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आईजवळ नेले.

12 नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.


पाच हजार लोकांना भोजन

13 ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकान्ती गेला; हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्यामागे पायीपायी गेले.

14 मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्‍यांना त्याने बरे केले.

15 दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे; लोकांनी गावांत जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”

16 येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.”

17 ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.”

18 तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.”

19 मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.

20 मग ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या.

21 जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया व मुलेदेखील होतीच.


येशू समुद्रावरून चालतो

22 नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले.

23 मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता.

24 इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनार्‍यापासून बर्‍याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते.

25 तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला.

26 शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, “भूत आहे!” आणि ते भिऊन ओरडले.

27 परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”

28 तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.”

29 त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला;

30 परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.”

31 येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”

32 मग ते तारवात चढल्यावर वारा पडला.

33 तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”

34 नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले.

35 आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले;

36 आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan