Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

लूककृत शुभवर्तमान 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


प्रस्तावना

1 ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक

2 ह्यांनी आम्हांला सांगून ठेवलेला वृत्तान्त लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे;

3 ह्यास्तव, थियफील महाराज, मलाही वाटले की, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात;

4 ह्यासाठी की, ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्‍चितपणा आपल्या लक्षात यावा.


बाप्तिस्मा करणार्‍या योहानाच्या जन्माचे भविष्य

5 यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्‍या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते.

6 ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.

7 अलीशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते; ती उभयता वयातीतही झाली होती.

8 एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता,

9 याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्रस्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले.

10 धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता.

11 तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला.

12 त्याला पाहून जखर्‍या अस्वस्थ व भयभीत झाला.

13 देवदूताने त्याला म्हटले, “जखर्‍या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव.

14 त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्लास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील.

15 कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो ‘द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही’; आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.

16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील.

17 ‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”

18 तेव्हा जखर्‍या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.”

19 देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे.

20 पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

21 इकडे लोक जखर्‍याची वाट पाहत होते व त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्‍चर्य वाटले.

22 तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना; तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले; तो त्यांना खुणा करत होता. तो तसाच मुका राहिला.

23 मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला.

24 त्या दिवसांनंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने एकान्तात राहिली;

25 ती म्हणत असे की, “लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले.”


कुमारी मरीयेला देवदूताचा संदेश

26 नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालीलातील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रीएल देवदूताला पाठवले.

27 ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.

28 देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”1

29 ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली.

30 देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे.

31 पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव.

32 तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल;

33 आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”

34 मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.”

35 देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.

36 पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे.

37 कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.”

38 तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.


मरीया अलीशिबेला भेटते

39 त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली;

40 आणि जखर्‍याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले.

41 तेव्हा असे झाले की, अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली;

42 आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य!

43 माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून?

44 पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्लासाने उडी मारली.

45 जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”


मरीयेचे स्तोत्र

46 तेव्हा मरीया म्हणाली : “‘माझा जीव प्रभूला’ थोर मानतो,

47 आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळे माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’

48 कारण ‘त्याने’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील!

49 कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत; आणि ‘त्याचे नाव पवित्र आहे.’

50 आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’

51 त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’

52 ‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’

53 ‘त्याने भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,’ व ‘धनवानांस रिकामे लावून दिले आहे.’

54 ‘आपल्या पूर्वजांस’ त्याने सांगितले ‘त्याप्रमाणे अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून

55 त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.”

56 नंतर मरीया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली.


बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा जन्म

57 अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला.

58 प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले.

59 मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बालकाची सुंता करण्यास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखर्‍या ठेवणार होते;

60 परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.”

61 ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगांत कोणी नाही.”

62 मग, “ह्याचे काय नाव ठेवायचे आहे,” असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले.

63 त्याने पाटी मागवून ‘ह्याचे नाव योहान आहे,’ असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले.

64 मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला.

65 ह्यावरून त्यांच्याभोवती राहणार्‍या सर्वांना त्याचे भय वाटले; आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले.

66 ऐकणार्‍या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.


जखर्‍याचे स्तोत्र

67 त्याचा बाप जखर्‍या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा :

68 “इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे;

69 आणि आपल्यासाठी त्याने आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे;

70 हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते;’

71 म्हणजे आपल्या ‘शत्रूंच्या’ व आपला ‘द्वेष करणार्‍या’ सर्वांच्या ‘हातून’ सुटका करावी;

72 अशासाठी की, ‘आपल्या पूर्वजांवर’ त्याने ‘दया’ करावी, आणि त्याने ‘आपला’ पवित्र ‘करार’,

73 म्हणजे जी शपथ आपला पूर्वज ‘अब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली’, ती ‘स्मरावी,’

74 ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून

75 माझ्यासमोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.

76 आणि हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्यापुढे’ चालशील;

77 ह्यासाठी की, त्याच्या लोकांना त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.

78 आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल.

79 ‘ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा,’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत.”

80 तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan