Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

लेवीय 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शांत्यर्पणे

1 कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल व तो गुराढोरांचा करायचा असेल तर यज्ञपशू नर असो किंवा मादी असो, तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा.

2 त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.

3 परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा : आतड्यांवर असलेली चरबी व त्यांना लागून असलेली सर्व चरबी,

4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत.

5 हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर, विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.

6 परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी शेरडामेंढरांचे अर्पण आणायचे असेल, ते नर असो किंवा मादी असो, त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे.

7 त्याला कोकराचे अर्पण करायचे असेल तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे.

8 त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा, आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.

9 परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा : त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी,

10 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;

11 आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्यान्न होय.

12 कोणाला बकर्‍याचे अर्पण करायचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे.

13 त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.

14 ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वराप्रीत्यर्थ होम करायचा तो भाग हा : आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी,

15 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी आणि गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;

16 आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय; कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.

17 तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये, हा तुम्हांला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan