लेवीय 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)अन्नार्पणे 1 कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करायचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा. 2 मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. 3 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय. 4 भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे. 5 तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे. 6 त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय. 7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. 8 अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे; ते याजकाकडे आणून द्यावे, व त्याने ते वेदीजवळ न्यावे. 9 याजकाने अन्नार्पणातून स्मारकभाग काढून वेदीवर त्याचा होम करावा; तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. 10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय. 11 परमेश्वराला अर्पण केलेल्या कोणत्याही अन्नार्पणात खमीर नसावे; कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पायचे नाहीत. 12 प्रथमउत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. 13 तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालायला चुकू नकोस; तुझ्या सर्व अर्पणांसह मीठसुद्धा अर्पावे. 14 परमेश्वराप्रीत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथमउपज अर्पायचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसांतले दाणे, म्हणजे हिरव्या कणसांचे चोळून काढलेले दाणे प्रथमउपजाचे अन्नार्पण म्हणून आण. 15 त्यावर तेल ओत व धूप ठेव; हे अन्नार्पण होय. 16 चोळून काढलेले दाणे व तेल ह्यांपैकी काही भाग स्मारकभाग म्हणून सर्व धूपासहित याजकाने जाळावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होय. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India