Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

लेवीय 16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


प्रायश्‍चित्ताचा दिवस

1 अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.

2 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की, तू भलत्या वेळी पवित्रस्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस, गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन.

3 अहरोनाने पवित्रस्थानात प्रवेश करावा तो ह्याप्रमाणे : त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे.

4 त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा; तागाचा चोळणा आपल्या अंगात घालावा; तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदील घालावा; ही पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावीत.

5 मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.

6 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्‍चित्त करावे.

7 मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत.

8 अहरोनाने त्या दोन बकर्‍यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी.1

9 ज्या बकर्‍यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा.

10 पण ज्या बकर्‍यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्या द्वारे प्रायश्‍चित्त व्हावे, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.

11 अहरोनाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे;

12 आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखार्‍यांनी भरलेले धूपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा;

13 तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की, त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरायचा नाही.

14 मग त्याने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे, आणि थोडे रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.

15 मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बकर्‍याचा वध करावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोर्‍ह्याच्या रक्ताचे केले तसेच बकर्‍याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.

16 आणखी त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता आणि अपराध ह्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या एकंदर पापांबद्दल पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्याबरोबर वसत असलेल्या दर्शन-मंडपासाठी त्याने तसेच करावे.

17 अहरोन प्रायश्‍चित्त करण्यासाठी पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हापासून तो स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्‍चित्त करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपात दुसरे कोणीही नसावे.

18 मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; गोर्‍ह्याचे थोडे रक्त आणि बकर्‍याचे थोडे रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूंच्या शिंगांना लावावे,

19 आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी.

20 नंतर पवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्याचे संपवल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.

21 अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व ती त्या बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.

22 तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकर्‍याला रानात सोडून द्यावे.

23 हे झाल्यावर अहरोनाने दर्शनमंडपात येऊन पवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरवून तेथे ठेवावीत.

24 मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे.

25 पापबलीच्या चरबीचा त्याने वेदीवर होम करावा.

26 पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा ज्या मनुष्याने सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे.

27 पापार्पणाच्या ज्या गोर्‍ह्याचे व पापार्पणाच्या ज्या बकर्‍याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्‍चित्त करण्यासाठी नेण्यात आले ते दोन्ही पशू छावणीबाहेर न्यावेत आणि त्यांचे कातडे, मांस व शेण अग्नीत जाळून टाकावे.

28 ते जाळून टाकणार्‍याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे.

29 तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो;

30 कारण त्या दिवशी तुम्हांला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल; परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल.

31 तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्बाथ होय; ह्या दिवशी तुम्ही आपल्या जिवांस दंडन करावे; हा निरंतरचा विधी होय.

32 आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्‍चित्त करावे.

33 त्याने पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.

34 इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्‍चित्त करण्यात यावे, म्हणून हा तुम्हांला निरंतरचा विधी होय.”परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan