लेवीय 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी नियम 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना सांग : स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने सात दिवस अशुद्ध राहावे; ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी. 3 आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. 4 नंतर त्या स्त्रीने आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहेतीस दिवस दूर बसावे. तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्रस्थानात जाऊ नये. 5 तिला मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर बसते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे, आणि आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस दूर बसावे. 6 तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची मुदत पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शनमंडपाच्या दारी याजकाकडे घेऊन जावा. 7 मग याजकाने ते परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा. 8 तिला मेंढा अर्पण करण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावे, आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे ती शुद्ध होईल.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India