Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

लेवीय 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शुद्ध व अशुद्ध प्राणी
( अनु. 14:3-21 )

1 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,

2 “इस्राएल लोकांना सांगा की, पृथ्वीवरील सर्व पशूंपैकी ज्यांचे मांस तुम्ही खावे ते हे :

3 पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत, व जे रवंथ करतात ते सर्व तुम्ही खावेत;

4 पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर विभागलेले आहेत ते पशू खाऊ नयेत; उंट हा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.

5 शाफान1 रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.

6 ससा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तोही तुम्ही अशुद्ध समजावा.

7 डुकराचा खूर विभागलेला आणि दुभंगलेला आहे पण तो रवंथ करत नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.

8 त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांच्या शवांना शिवू नये; तुम्ही ते अशुद्ध समजावे.

9 जलचरांपैकी तुम्ही खावेत ते हे : जलाशयांत, समुद्रांत व नद्यांत संचार करणार्‍या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावेत.

10 जलचरांपैकी ज्या प्राण्यांना पंख अथवा खवले नाहीत असे समुद्रांत व नद्यांत संचार करणारे सर्व जलचर तुम्ही ओंगळ समजावेत;

11 तुम्ही त्यांना ओंगळ समजावे; त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांची शवे ओंगळ समजावीत.

12 जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत.

13 पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत : गरुड, लोळणारा गीध, कुरर,

14 घार, निरनिराळ्या जातींचे ससाणे,

15 निरनिराळ्या जातींचे कावळे,

16 शहामृग, गवळण,2 कोकीळ, निरनिराळ्या जातींचे बहिरी ससाणे,

17 पिंगळा, करढोक, मोठे घुबड,

18 पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड,

19 करकोचा, निरनिराळ्या जातींचे बगळे,3 टिटवी आणि वाघूळ.

20 जितके सपक्ष प्राणी चार पायांवर चालतात तितके तुम्ही ओंगळ समजावेत.

21 पण चार पायांवर चालणार्‍या सपक्ष प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायांसह तंगड्या असतात ते खावेत.

22 त्यांच्यापैकी तुम्ही खावेत ते हे : निरनिराळ्या जातीचे टोळ, निरनिराळ्या जातींचे नाकतोडे, निरनिराळ्या जातींचे खरपुडे, व निरनिराळ्या जातींचे गवत्ये टोळ.

23 तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावेत.

24 त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा.

25 त्यांच्या शवांचा एखादा भाग जो कोणी उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

26 ज्या पशूचे खूर विभागलेले असून दुभंगलेले नाहीत व जो रवंथ करीत नाही तो तुम्ही अशुद्ध समजावा. जो कोणी त्याला शिवेल तो अशुद्ध समजावा.

27 चार पायांवर चालणार्‍या सर्व पशूंपैकी जे आपल्या पंजांवर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावेत, त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

28 जो त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावेत.

29 जमिनीवर रांगणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावेत ते हे : मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातींचे सरडे,

30 चोपय (सापसुरळी), घोरपड, पाल, सांडा व गुहिर्‍या सरड.

31 जमिनीवर रांगणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे तुम्ही अशुद्ध समजावेत. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर तीही अशुद्ध समजावी; मग ते लाकडी पात्र, वस्त्र, कातडे, तरट, किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते शुद्ध होईल.

33 त्यांच्यापैकी एखादा मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.

34 त्या पात्रातील एखादा खाद्यपदार्थ पाण्याने भिजला असल्यास तो अशुद्ध समजावा; आणि असल्या पात्रात काही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे;

35 आणि त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून पाडून टाकावी; त्यामुळे ती अशुद्ध होते, म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.

36 तथापि झरा किंवा विहीर जिच्यात पाण्याचा संचय असतो ती शुद्धच राहते; तरी तिच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध समजावा.

37 त्यांच्या शवांचा काही भाग पेरण्याच्या बियाणांवर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे.

38 तथापि ते बियाणे पाण्याने भिजल्यानंतर त्या प्राण्यांच्या शवांचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.

39 खाण्याजोग्या पशूंपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

40 कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

41 जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; ते खाऊ नयेत.

42 जमिनीवर रांगणार्‍यांपैकी जे सर्व सरपटतात अथवा चार पायांवर चालतात व ज्यांना पुष्कळ पाय आहेत ते तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.

43 तुम्ही कोणत्याही जातीच्या रांगणार्‍या प्राण्यांमुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका.

44 मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्‍या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.

45 कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”

46 पशू, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्यातील

47 अशुद्ध व शुद्ध, भक्ष्य प्राणी व अभक्ष्य प्राणी हा भेद ओळखण्याचा हा नियम होय.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan