Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

लेवीय 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


होमार्पणे

1 परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारून म्हटले,

2 “इस्राएल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांतला अर्पावा.

3 गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.

4 यज्ञपशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्या प्रायश्‍चित्तादाखल मान्य होईल.

5 त्याने परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या वेदीवर सभोवती शिंपडावे.

6 मग त्या यज्ञपशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावेत.

7 नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावीत;

8 आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर पशूचे ते तुकडे, डोके व चरबी रचावी.

9 त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.

10 शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.

11 त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर वेदीच्या उत्तर बाजूस करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.

12 त्याने त्याचे कापून तुकडे करावेत आणि त्याचे डोके व चरबी ह्यांसहित सर्व तुकडे याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर रचावेत.

13 त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.

14 परमेश्वराप्रीत्यर्थ त्याला पक्ष्याचे होमार्पण करायचे असल्यास होले किंवा पारव्याची पिले त्याने अर्पावीत.

15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ नेऊन त्याचे मुंडके मुरगळून तोडून वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे;

16 त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावीत.

17 पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत; मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan