Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

विलापगीत 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बंदिवान सीयोनेचा शोक

1 हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!

2 ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.

3 यहूदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे; ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही; तिचा पाठलाग करणार्‍या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठले आहे.

4 पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.

5 तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्‍यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत.

6 सीयोनकन्येचे सर्व तेज गेले आहे; तिचे सरदार चारा नसलेल्या हरिणांसारखे झाले आहेत; ते पाठलाग करणार्‍यापुढून हतबल होऊन पळाले आहेत.

7 यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्‍याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.

8 यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.

9 तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”

10 वैर्‍याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरवला आहे. विदेशी तिच्या पवित्रस्थानात आले हे तिने पाहिले आहे; त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस.

11 तिचे सर्व लोक उसासे टाकत आहेत, अन्नान्न करीत आहेत, आपला प्राण वाचवण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदल्यात आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत. “हे परमेश्वरा, लक्ष लावून पाहा, मी कशी तुच्छ झाले आहे!”

12 “येणार्‍याजाणार्‍यांनो, हे पाहून तुम्हांला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले; ह्या माझ्या दु:खासारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्षपूर्वक पाहा.

13 त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.

14 माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.

15 प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.

16 ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”

17 सीयोनेने आपले हात पसरले, पण तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; परमेश्वराने याकोबासंबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैर्‍यांनी त्याला घेरले आहे; यरुशलेम त्यांच्यामध्ये अशुचि झाली आहे.

18 “परमेश्वर न्यायपरायण आहे, मी तर त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आहे; अहो सर्व लोकहो, आता ऐका, माझे दुःख पाहा; माझ्या कुमारी व माझे तरुण बंदिवान होऊन गेले आहेत.

19 मी आपल्या वल्लभांना बोलावले, पण त्यांनी मला दगा दिला आहे; आपला जीव वाचवावा म्हणून आपल्यासाठी अन्न शोधता शोधता माझे याजक व माझे वडील जन नगरात मेले.

20 हे परमेश्वरा, पाहा, मी किती संकटात आहे! माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे; माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पाहावे तर तलवार मला निर्वंश करते, आत पाहावे तर मृत्यू आहे.

21 त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.

22 त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan