Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


आखानाचे पातक

1 इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला; यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला.

2 बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले.

3 नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, “सर्व लोकांनी तेथे जायला नको, फक्त दोन-तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत.”

4 म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला.

5 आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले; त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले.

6 तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली.

7 यहोशवा म्हणाला, “हायहाय! हे प्रभू परमेश्वरा, आम्हांला अमोर्‍यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देनेपार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देनेपलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते!

8 हे प्रभो, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली; आता मी काय बोलू?

9 कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील; तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?”

10 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “ऊठ, असा पालथा का पडलास?

11 इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.

12 म्हणून इस्राएल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही; ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही.

13 तर ऊठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग : उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.’

14 सकाळी तुम्हांला आपापल्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल; मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकेका कुळाने पुढे यावे; नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळातील एकेका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकेका पुरुषाने पुढे यावे;

15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूर्खपणा केला आहे.”

16 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकेक वंश समोर आणला, तेव्हा यहूदा वंश पकडला गेला;

17 मग त्याने यहूदाची कुळे समोर आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. नंतर जेरहाच्या कुळातली घराणी1 समोर आणण्यात आली तेव्हा जब्दीचे घराणे पकडले गेले.

18 मग त्याच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला समोर आणण्यात आले, तेव्हा यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह पकडला गेला.

19 तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान; त्याच्यापुढे कबूल कर; तू काय केलेस ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नकोस.”

20 आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, “मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे :

21 लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या, तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या; पाहा, माझ्या डेर्‍यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत, व रुपे खाली आहे.”

22 तेव्हा यहोशवाने जासूद पाठवले. ते डेर्‍याकडे धावत गेले; आणि पाहा, त्याच्या डेर्‍यात त्या वस्तू लपवलेल्या होत्या व खाली रुपे होते.

23 त्यांनी त्या डेर्‍यातून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या.

24 त्यानंतर यहोशवाने व त्याच्याबरोबरच्या सर्व इस्राएल लोकांनी आखान बिन जेरह ह्याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरे, त्याचा डेरा व त्याचे जे काही होतेनव्हते ते सर्व आखोर खिंडीत नेले.

25 यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.

26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिंड म्हणत आले आहेत.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan