Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यार्देन नदीतून घेतलेले बारा धोंडे

1 राष्ट्रातील झाडून सारे लोक यार्देनेपलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशवाला म्हणाला,

2 “प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष लोकांमधून निवडा,

3 आणि त्यांना अशी आज्ञा दे : यार्देनेच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या स्थळी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.”

4 मग यहोशवाने इस्राएल लोकांतील वंशांतून एकेक असे जे बारा पुरुष तयार ठेवले होते त्यांना बोलावले.

5 यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे एकेक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,

6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, आणि पुढे तुमची मुलेबाळे विचारतील की, ‘ह्या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे?’

7 तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.”

8 यहोशवाच्या ह्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे बारा धोंडे यार्देनेच्या मध्यभागातून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले.

9 तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथे आहेत.

10 मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक लवकर लवकर पार उतरून गेले.

11 झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्यादेखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.

12 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे पलीकडे गेले;

13 युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले.

14 त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली; म्हणून जसे ते मोशेचे भय धरत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले.

15 परमेश्वर यहोशवाला म्हणाला,

16 “साक्षपटाचा कोश वाहणार्‍या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.”

17 त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनेतून वर निघून येण्याची आज्ञा केली.

18 मग परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पूर्ववत दुथडी भरून वाहू लागले.

19 पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले.

20 यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे उभे केले.

21 तो इस्राएल लोकांना म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपापल्या वडिलांना विचारतील, ‘ह्या धोंड्यांचे महत्त्व काय?’

22 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल ह्या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार आले.’

23 आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता, त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली.

24 ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल, आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचा त्यांना1 निरंतर धाक वाटेल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan