Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


इस्राएल लोक यार्देन नदी ओलांडतात

1 यहोशवा पहाटेस उठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला.

2 तीन दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले.

3 त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश लेवीय याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हालवून त्याच्या पाठोपाठ जा;

4 पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हांला जायचे आहे ती तुम्हांला समजेल; कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाहीत.”

5 मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे.”

6 नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला.” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले.

7 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल.

8 कराराचा कोश वाहणार्‍या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा.”’

9 मग यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका.”

10 यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल :

11 अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे.

12 तर आता इस्राएल वंशांतून बारा पुरुष तुम्ही निवडा; प्रत्येक वंशातून एकेक.

13 अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल.”

14 लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेर्‍यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले;

15 कोश वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहचले आणि कोश वाहणार्‍या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसांत यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते);

16 तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्‍याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.

17 परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले, आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे निघून गेले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan