Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यार्देनेजवळ उभारलेली वेदी

1 मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना बोलावून सांगितले,

2 “परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व केले आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली.

3 आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंदांना सोडून गेला नाहीत आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली.

4 आता तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुमच्या भाऊबंदांना विसावा दिला आहे, तर परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेपलीकडे तुम्हांला जो देश तुमच्या ताब्यात दिला आहे तेथे तुम्ही आता आपापल्या डेर्‍यांकडे परत जा.

5 मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जिवेभावे त्याची सेवा करा.”

6 मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले, आणि ते आपापल्या डेर्‍यांकडे चालते झाले.

7 मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनेच्या पश्‍चिमेस त्यांच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले होते. यहोशवाने त्यांना आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला,

8 “विपुल पशू आणि रुपे, सोने, कांसे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेर्‍यांकडे परत जा; आपल्या शत्रूंपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंदांबरोबर वाटून घ्या.”

9 मग रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्राएल लोकांतून कनान देशातल्या शिलोहून निघाले आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काबीज केलेल्या गिलाद देशाकडे म्हणजे त्यांच्या वतनाकडे ते परत गेले.

10 जेव्हा रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक कनान देशातील यार्देनथडीच्या प्रदेशात आले तेव्हा त्यांनी यार्देनेजवळ एक मोठी वेदी बांधली.

11 रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी कनान देशाच्या पूर्व सीमेला, इस्राएल लोकांच्या ताब्यातील प्रदेशात, यार्देनेच्या तीरावर एक वेदी बांधल्याचे वर्तमान इस्राएल लोकांनी ऐकले.

12 इस्राएल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली.

13 मग इस्राएल लोकांनी रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे गिलाद देशात एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याला पाठवले;

14 आणि त्याच्याबरोबर इस्राएल लोकांच्या वंशांच्या पितृकुळातील प्रत्येक वंशामागे एक असे दहा सरदार पाठवले; ते इस्राएल लोकांच्या कुळांतील आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते.

15 ते गिलाद देशात रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे जाऊन म्हणाले,

16 “परमेश्वराची सर्व मंडळी म्हणत आहे, ‘तुम्ही इस्राएलाच्या देवाचा हा काय विश्वासघात केला? आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून व त्याच्याविरुद्ध बंड पुकारण्यासाठी तुम्ही ही वेदी बांधली आहे.

17 पाहा, पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही,

18 हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या इस्राएलाच्या सर्व मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल.

19 तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवासमंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनाच्या देशात नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या, पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्याविरुद्धही बंड करू नका.

20 जेरहाचा मुलगा आखान ह्याने समर्पित वस्तूंबाबत विश्वासघात केला तेव्हा इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नव्हता काय? त्याच्या अपराधामुळे त्याचा एकट्याचाच नाश झाला असे नाही.”’

21 तेव्हा रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्राएली पितृकुळांच्या प्रमुखांना म्हणाले,

22 “देवाधिदेव परमेश्वर, देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्राएलासही ठाऊक होवो की, आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हांला जिवंत न ठेवो!

23 परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली असली, किंवा तिच्यावर होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांत्यर्पणे वाहण्यासाठी बांधली असली, तर परमेश्वर स्वतःच आमचे पारिपत्य करो.

24 खरोखरच आम्ही पुढचा विचार करून व विशिष्ट हेतूने हे कृत्य केले आहे; आम्हांला वाटले, मागेपुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणायची की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध?

25 अहो रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने तुमच्या-आमच्यामध्ये यार्देनेची सीमा नेमून दिली आहे, तेव्हा तुम्हांला परमेश्वराशी काही कर्तव्य नाही असे म्हणून तुमची मुले आमच्या मुलांना परमेश्वराचे भय सोडून द्यायला लावतील.

26 म्हणून आम्ही म्हटले की, चला, आपण एक वेदी बांधू; ती होमबली अथवा यज्ञबली अर्पण करण्यासाठी नव्हे,

27 तर ती तुमच्या-आमच्यामध्ये व आमच्यामागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी, ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे करून परमेश्वरासमोर उपासना करावी, म्हणजे परमेश्वराशी तुम्हांला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये.

28 आम्ही म्हटले, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, परमेश्वराच्या वेदीचा हा नमुना पाहा; आमच्या पूर्वजांनी ती होमबली अथवा यज्ञबली अर्पण करण्यासाठी बांधलेली नाही, पण ती तुमच्या-आमच्यामध्ये साक्षीदाखल आहे.

29 आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण व यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याची त्याच्या निवासमंडपासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्या हातून कदापि न घडो.”

30 रऊबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशांचे हे म्हणणे ऐकून फिनहास याजक व त्याच्याबरोबर असलेले इस्राएल वंशाचे सरदार म्हणजे इस्राएली पितृकुळाचे प्रमुख ह्यांचे समाधान झाले.

31 तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याने रऊबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, “आज आमची खात्री झाली आहे की, परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही; तुम्ही आता इस्राएल लोकांना परमेश्वराच्या हातून वाचवले आहे.”

32 तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास व सरदार हे रऊबेनी व गादी ह्यांच्यापासून निघून गिलादातून कनान देशास इस्राएल लोकांकडे परत गेले व त्यांनी त्यांना हा वृत्तान्त सांगितला,

33 तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आणि रऊबेनी व गादी ह्यांच्याशी लढण्याची अथवा ते राहतात तो देश उद्ध्वस्त करण्याची गोष्ट त्यांनी पुन्हा काढली नाही.

34 रऊबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद (साक्ष) असे ठेवले; कारण ते म्हणाले, “परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan