Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


लेव्यांची नगरे
( १ इति. 6:54-81 )

1 मग एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा व इस्राएल वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्याकडे लेवी वंशांतील पितृकुळांचे प्रमुख आले;

2 ते कनान देशातील शिलो येथे येऊन म्हणाले, “आमच्या वस्तीसाठी नगरे आणि आमच्या जनावरांसाठी गायराने द्यावीत अशी आज्ञा परमेश्वराने मोशेच्या द्वारे केली होती.”

3 त्यावरून इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या वतनातून लेव्यांना नगरे व गायराने दिली, ती येणेप्रमाणे :

4 कहाथी कुळांची चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांपैकी अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली.

5 बाकीच्या कहाथी वंशजांना एफ्राईम वंशातील कुळांच्या वाट्यांतून, दान वंशाच्या वाट्यांतून आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यांतून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली.

6 गेर्षोन वंशजांना इस्साखार वंशांतील कुळांच्या आणि आशेर व नफताली ह्यांच्या वंशांच्या आणि बाशानातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली.

7 मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी बारा नगरे दिली.

8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी लेव्यांना चिठ्ठ्या टाकून ही नगरे व त्यांची गायराने दिली.

9 त्यांनी यहूदा व शिमोन ह्यांच्या वंशांची पुढे सांगितलेली नगरे दिली,

10 ही नगरे लेवी वंशातील कहाथी कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी होती; कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.

11 त्यांना त्यांनी यहूदातील डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन हे नगर सभोवतालच्या गायरानांसह दिले; आर्बा हा अनाकाचा मूळ पुरुष होता;

12 पण त्या नगराची शेती आणि त्याखालील खेडी ही यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला त्यांनी वतनादाखल दिली होती.

13 अहरोन याजकाच्या वंशजांना, मनुष्यवध करणार्‍यांसाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्यांखेरीज लिब्ना व त्याचे गायरान,

14 यत्तीर व त्याचे गायरान, एष्टमोवा व त्याचे गायरान,

15 होलोन व त्याचे गायरान, दबीर व त्याचे गायरान,

16 अईन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान अशी एकंदर नऊ नगरे त्या दोन वंशांच्या वतनातून दिली.

17 बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान,

18 अनाथोथ व त्याचे गायरान आणि अलमोन व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली.

19 अशा प्रकारे अहरोन वंशांतील याजकांना तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.

20 बाकीच्या कहाथी वंशांतील लेव्यांना चिठ्ठी टाकून एफ्राईम वंशाच्या वतनातून नगरे दिली.

21 मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम व त्याचे गायरान; ह्यांखेरीज गेजेर व त्याचे गायरान,

22 किबसाईम व त्याचे गायरान आणि बेथ-होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे त्यांना दिली.

23 दान वंशाच्या वतनातून एल्तके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान,

24 अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही चार नगरे त्यांनी दिली.

25 मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून तानख व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही दोन नगरे दिली.

26 अशा प्रकारे बाकी राहिलेल्या कहाथी वंशजांच्या कुळांची अशी एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने होती.

27 लेव्यांच्या कुळांपैकी गेर्षोनाच्या वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले बाशानातले गोलान व त्याचे गायरान, ह्यांखेरीज बैश्तरा व त्याचे गायरान अशी दोन नगरे दिली.

28 इस्साखार वंशाच्या वतनातून किशोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान,

29 यर्मूथ व त्याचे गायरान आणि एन-गन्नीम व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.

30 आशेर वंशाच्या वतनातून मिशाल व त्याचे गायरान, अब्दोन व त्याचे गायरान,

31 हेलकथ व त्याचे गायरान आणि रहोब व त्याचे गायरान ही चार नगरे दिली.

32 नफताली वंशाच्या वतनातून मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गालीलातले केदेश व त्याचे गायरान, ह्याखेरीज हम्मोथ-दोर व त्याचे गायरान आणि कर्तान व त्याचे गायरान ही तीन नगरे दिली.

33 येणेप्रमाणे गेर्षोन वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर तेरा नगरे त्यांच्या गायरानांसह होती.

34 बाकीच्या लेव्यांना म्हणजे मरारी कुळांना जबुलून वंशाच्या वतनांतून यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान,

35 दिम्ना व त्याचे गायरान आणि नहलाल व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली.

36 रऊबेन वंशाच्या वतनांतून बेसेर व त्याचे गायरान, याहस व त्याचे गायरान,

37 कदेमोथ व त्याचे गायरान आणि मेफाथ व त्याचे गायरान अशी चार नगरे त्यांनी दिली.

38 मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गाद वंशाच्या वतनातले गिलादातील रामोथ व त्याचे गायरान, ह्यांखेरीज महनाईम व त्याचे गायरान,

39 हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली.

40 ह्याप्रमाणे लेव्यांतील बाकीच्या कुळांना म्हणजे मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांनी दिली.

41 इस्राएल लोकांच्या वतनांत लेव्यांची एकंदर अठ्ठेचाळीस नगरे त्यांच्या गायरानांसह होती.

42 ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानांसह होती; सर्व नगरांची हीच परिस्थिती होती.


इस्राएल लोक देशाचा ताबा घेतात

43 इस्राएल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले.

44 परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. त्यांच्या कोणाही शत्रूला त्यांच्यापुढे टिकाव धरवला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.

45 परमेश्वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan