यहोशवा 20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)नेमलेली शरणपुरे ( गण. 35:6-34 ; अनु. 4:41-43 ; 19:1-13 ) 1 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 2 “इस्राएल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हांला सांगितले होते की, तुमच्याकरता शरणपुरे नेमा, 3 म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जिवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणार्यापासून स्वतःचा बचाव करता येईल. 4 असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकिकत सांगावी; मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी. 5 रक्तपाताचा सूड उगवणार्याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणार्याला त्याच्या हाती देऊ नये; कारण त्याने नकळत आपल्या शेजार्याचा वध केला आहे; त्याचे त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते. 6 मंडळीसमोर त्याचा न्याय होईपर्यंत अथवा त्या वेळचा मुख्य याजक जिवंत असेपर्यंत त्याने त्या नगरात राहावे; मग पाहिजे तर ज्या गावाहून तो पळाला होता तेथे त्याने परत जाऊन आपल्या घरी राहावे.” 7 ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली. 8 यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांनी रऊबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागांपैकी गिलादातील रामोथ आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली. 9 सर्व इस्राएल लोकांसाठी व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्या उपर्या लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जिवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला, तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणार्याकडून त्याची हत्या होऊ नये. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India