Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शिलो येथील प्रदेशाची वाटणी

1 मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.

2 परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते.

3 यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार?

4 प्रत्येक वंशातील तीन पुरुष नेमा म्हणजे मी त्यांना पाठवतो; त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळायच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे.

5 त्यांनी त्याचे सात भाग करावेत; यहूदाने दक्षिणेकडील आपल्या नेमलेल्या वतनभागात वस्ती करावी आणि योसेफाच्या वंशजांनी उत्तरेकडील आपल्या वतनभागात राहावे.

6 सात भागांचे वर्णन लिहून माझ्याकडे आणावे, म्हणजे मी येथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.

7 लेव्यांना तर तुमच्यामध्ये वतन नाही; परमेश्वराने त्यांना दिलेली याजकवृत्ती हीच त्यांचे वतन होय; गाद, रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना यार्देनेच्या पूर्वेस वतन मिळून चुकले आहे; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांना ते दिले आहे.”

8 मग ते पुरुष मार्गस्थ झाले; तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहिण्यासाठी जे जाणार होते त्यांना यहोशवाने आज्ञा दिली की, “जा, देशभर फिरा. आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”

9 तेव्हा ते पुरुष तेथून निघून देशभर फिरले व त्यातील नगरांप्रमाणे त्याच्या सात वाट्यांचे वर्णन त्यांनी वहीत लिहिले व ते शिलो येथील छावणीत यहोशवाकडे आले.

10 शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश

11 बन्यामिनाच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे मिळालेला वाटा हा : त्यांचा वाटा यहूदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता.

12 त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्‍चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेथ-आवेनच्या रानापर्यंत जाते.

13 तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटारोथ-अद्दार येथे येते.

14 तेथून मग पश्‍चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्‍चिम सीमा हीच.

15 दक्षिणेकडील सीमा पश्‍चिमेकडे सुरू होऊन किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नफ्तोह पाणवठ्यावर जाते;

16 तेथून हिन्नोमपुत्राच्या खोर्‍याच्या पूर्वेस व रेफाईम खोर्‍याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोर्‍यात म्हणजे यबूसी ह्यांच्या दक्षिणेकडे ती सीमा एन-रोगेल येथे उतरते;

17 तेथून ती सीमा उत्तरेकडे वळून एन-शेमेश येथे निघते आणि तशीच अदुम्मीम चढावाच्या पूर्वेस असलेल्या गलीलोथाकडे जाते; तेथून ती रऊबेनपुत्र बोहन ह्याच्या खडकाकडे जाते.

18 मग ती उत्तरेकडे जाऊन बेथ-अराबाच्या बाजूने खाली अराबात येते.

19 तेथून ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेस यार्देनेच्या मुखाजवळ जाते; ही दक्षिण सीमा होय.

20 यार्देन ही त्याची पूर्व सीमा होय. बन्यामिनाच्या संतानाचे वतन त्याच्या चतुःसीमांसहित त्यांच्या कुळांप्रमाणे हे आहे.

21 बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या कुळां-प्रमाणे ही नगरे मिळाली : यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केसीस,

22 बेथ-अराबा, समाराईम, बेथेल,

23 अव्वीम, पारा, अफ्रा,

24 कफर-अम्मोनी, अफनी आणि गेबा; ही बारा नगरे व त्यांखालील खेडी;

25 गिबोन, रामा व बैरोथ;

26 मिस्पे, कफीरा व मोजा;

27 रेकेम, इर्पैल व तरला;

28 सेला, एलेफ, यबूसी, हेच यरुशलेम, गिबाथ व किर्याथ; ही चौदा नगरे व त्यांखालील खेडी; बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे हे वतन आहे.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan