Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


चिठ्ठ्या टाकून कनान देशाची वाटणी

1 एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएली वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी ही वतने इस्राएल लोकांना कनान देशात वाटून दिली.

2 परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते साडेनऊ वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले;

3 अडीच वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काहीएक वतन दिले नव्हते.

4 योसेफाच्या संतानाचे दोन वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम; त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप ह्यांच्यासाठी गायराने दिली होती.

5 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेला अनुसरून इस्राएल लोकांनी तो देश वाटून घेतला. कालेबाला हेब्रोन देण्यात येते

6 मग यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, “परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश-बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच.

7 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरायला कादेश-बर्ण्याहून पाठवले तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली.

8 माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणीपाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो.

9 त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की, ‘तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईलच होईल.’

10 इस्राएल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आज पंचेचाळीस वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे; आज बघ, मी पंचाऐंशी वर्षांचा आहे.

11 मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे; लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्या वेळी होती तेवढीच आजही आहे.

12 तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.”

13 मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले,

14 म्हणूनच कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे; ह्याचे कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला.

15 पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan