Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


काबीज करायचा उरलेला प्रदेश

1 यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता; तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा राहिला आहे.

2 बाकी राहिलेला देश हा : पलिष्टी आणि गशूरी ह्यांचा अवघा प्रदेश,

3 (मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);

4 ह्यांखेरीज दक्षिणेकडले अव्वी, अफेक व अमोर्‍यांच्या सरहद्दीपर्यंतचा कनान्यांचा सर्व देश व सीदोन्यांचा मारा नावाचा देश;

5 आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल-गादापासून हमाथाच्या खिंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन.

6 लबानोनापासून मिस्रपोथ-माईमापर्यंतच्या डोंगराळ प्रदेशातील सीदोनाच्या रहिवाशांना मी इस्राएल लोकांपुढून घालवून देईन; तू मात्र माझ्या आज्ञेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्यांचा देश इस्राएल लोकांना वाटून दे.

7 हा देश नऊ वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतनादाखल वाटून दे.” मनश्शे, रऊबेन व गाद ह्यांना देण्यात आलेला प्रदेश

8 मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रऊबेनी व गादी ह्यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांच्याशी ठरवल्याप्रमाणे पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांना वतन दिले आहे,

9 म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून दीबोनापर्यंतचे मेदबाचे पठार,

10 हेशबोनावर राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याची अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सारी नगरे,

11 गिलाद, तसेच गशूरी व माकाथी ह्यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलकापर्यंतचा सर्व बाशान,

12 म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग ह्याचे सारे राज्य; ह्यांचा मोशेने मोड करून त्यांना हाकून लावले होते.

13 तरी इस्राएल लोकांनी गशूरी व माकाथी ह्यांना देशाबाहेर काढले नाही; गशूरी व माकाथी आजवर इस्राएलात वस्ती करून आहेत.

14 लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्ये ही त्यांचा वतनभाग होत.

15 मोशेने रऊबेनी वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे वतन दिले.

16 त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,

17 हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन;

18 याहस, कदेमोथ, मेफाथ,

19 किर्याथाईम, सिब्मा खोर्‍यातील पहाडावरील सरेथ शहर,

20 बेथ-पौर, पिसगाच्या उतरणी, बेथ-यशिमोथ,

21 पठारावरली सर्व नगरे, हेशबोनात राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे सर्व राज्य; ह्या राजाला व त्याच्याबरोबर त्या देशात राहणारे सीहोनाचे मांडलिक म्हणजे मिद्यानाचे सरदार अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्यांना मोशेने ठार मारले.

22 इस्राएल लोकांनी तलवारीने ज्यांचा संहार केला त्यांत बौराचा पुत्र बलाम दैवज्ञ हाही होता.

23 यार्देन व तिला लागून असलेली जमीन रऊबेन्यांची सीमा ठरली. रऊबेन्यांचा वतनभाग त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हाच ठरला.

24 मग मोशेने गाद वंशालाही त्यांच्या कुळांप्रमाणे वतन दिले.

25 त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.

26 हेशबोनापासून रामाथ-मिस्पे व बटोनीम येथपर्यंतचा प्रदेश; महनाइमापासून दबीराच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश.

27 खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन ह्याचे उरलेले राज्य; यार्देन व तिच्या पूर्वेस किन्नेरेथ सरोवराच्या शेवटापर्यंतचा तिला लागून असलेला प्रदेश.

28 गाद्यांचे वतन त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हेच ठरले.

29 मग मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला वतन दिले; ते मनश्शेच्या अर्ध्या वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे दिले होते.

30 त्यांचा मुलुख महनाइमापासून सगळा बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग ह्याचे सर्व राज्य आणि बाशानातली याईर येथील सगळी साठ नगरे येथपर्यंत होता.

31 अर्धा गिलाद आणि बाशानाचा राजा ओग ह्याच्या राज्याच्या अष्टारोथ व एद्रई ह्या राजधान्या, मनश्शेचा पुत्र माखीर ह्याच्या वंशाचे म्हणजे माखीराच्या अर्ध्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन ठरले.

32 यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे मवाबाच्या मैदानात मोशेने वाटून दिलेली वतने ही होत;

33 पण लेवी वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर हाच त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे वतन होय.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan