Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी

1 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की,

2 “माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.

3 मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे.

4 रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल.

5 तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.

6 खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.

7 मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील.

8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल.

9 मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”

10 मग यहोशवाने लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की,

11 “छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की, ‘आपली भोजनसामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसांच्या आत तुम्हांला ही यार्देन ओलांडायची आहे.”’

12 मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले,

13 “परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हांला जी आज्ञा दिली होती तिचे स्मरण करा; तो तुम्हांला म्हणाला होता की, ‘तुम्हांला स्वास्थ्य मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हांला देणार आहे.’

14 ह्या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हांला दिला आहे त्यातच तुमच्या स्त्रिया, मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी राहावे; पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे कूच करावे आणि त्यांना कुमक द्यावी.

15 परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना स्वास्थ्य देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा तेही ताबा घेतील; मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हांला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्यात तुम्ही वास्तव्य करावे.”

16 तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.

17 जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू; मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.

18 तुझ्या आज्ञेविरुद्ध बंड करणार्‍या व तुझी सर्व आज्ञावचने न पाळणार्‍या प्रत्येकाला देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व हिम्मत धर.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan