Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

योएल 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराने केलेला राष्ट्रांचा न्याय

1 पाहा, त्या दिवसांत मी यहूदा व यरुशलेम ह्यांचा बंदिवास फिरवीन;

2 तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून यहोशाफाट2 ह्या नावाच्या खोर्‍यात आणीन आणि माझे लोक, माझे वतन इस्राएल, ह्यांना त्यांनी राष्ट्रांत विखरून माझा देश वाटून घेतला म्हणून तेथे त्यांच्यावर दावा मांडीन.

3 त्यांनी माझे लोक पणाला लावले, त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली, द्राक्षारस पिण्यासाठी त्यांनी मुलगी विकली.

4 सोर, सीदोन व पलेशेथाचे सर्व प्रदेशहो, तुम्ही माझे काय करणार? मी केलेल्याचा बदला घेता काय? अथवा मला काही करता काय? मी त्वरेने तुमचे कृत्य तुमच्या माथी मारीन.

5 कारण तुम्ही माझे सोनेरुपे हरण केले आहे, तुम्ही माझी उत्तम रत्ने आपल्या देवळांत नेली आहेत.

6 यहूदा व यरुशलेम ह्यांतील लोकांना त्यांच्या देशातून काढून दूर न्यावे म्हणून तुम्ही त्यांना ग्रीस3 येथील लोकांना विकले.

7 पाहा, जेथे तुम्ही त्यांना विकून पाठवले तेथून त्यांची उठावणी करून त्यांना मी आणीन आणि तुमची कृती तुमच्या माथी मारीन.

8 आणि तुमचे पुत्र व कन्या ह्यांना विकून यहूद्यांच्या हाती देईन आणि ते त्यांना दूरच्या राष्ट्रांना म्हणजे शबाई लोकांना विकतील असे परमेश्वराने म्हटले आहे.”

9 राष्ट्रांमध्ये हे जाहीर करा; यज्ञयाग करून लढाईची तयारी करा, वीरांची उठावणी करा; सर्व लढवय्यांना एकत्र होऊ द्या, आणि त्यांना चाल करू द्या.

10 तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा; “मी वीर आहे” असे अशक्तही म्हणो.

11 सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करून या व एकत्र जमा; हे परमेश्वरा, तुझे वीर तेथे आण.

12 राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोर्‍यात येवोत; तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.

13 विळा चालवा, पीक तयार आहे; या, चला, उतरा, द्राक्षांचा घाणा भरला आहे; कुंडे भरून वाहत आहेत; कारण लोकांची दुष्टाई फार आहे.

14 लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोर्‍यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोर्‍यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे.

15 सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशण्याचे थांबतात.


यहूदाची सुटका

16 परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.

17 “सीयोनेवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हांला कळेल, तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल; ह्यापुढे परके त्यातून येणार-जाणार नाहीत.

18 त्या दिवशी असे होईल की, पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, व यहूदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील; परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिट्टीमाच्या खोर्‍यास पाणी पुरवील.

19 मिसर देश उजाड होईल व अदोम वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहूदाच्या वंशजांवर बलात्कार केला.”

20 यहूदा तर सर्वकाळ वसेल, यरुशलेम पिढ्यानपिढ्या राहील.

21 त्यांचे पाडलेले रक्त मी निर्दोष ठरवीन, ते पूर्वी निर्दोष ठरवले नव्हते, कारण परमेश्वर सीयोनात वस्ती करतो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan