Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


अलीफज ईयोबाला धमकावतो

1 मग अलीफज तेमानी म्हणाला,

2 “तुझ्याशी मी काही बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? तरी बोलल्यावाचून कोणाच्याने राहवेल?

3 पाहा, तू बहुत जनांस शिक्षण दिले आहेस, आणि दुर्बळ हात सबळ केले आहेत.

4 तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहेस, लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत;

5 पण तुझ्यावर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस; तुला दुःखस्पर्श झाला म्हणजे तू घाबरतोस,

6 तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? तुझ्या सात्त्विक आचरणावर तुझी आशा आहे ना?

7 कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? नीतिमान कधी विलयास गेले आहेत काय? ह्याचा विचार कर.

8 माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.

9 देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीतसे होतात.

10 सिंहाची गर्जना खुंटते, विक्राळ सिंहाचा नाद खुंटतो, तरुण सिंहाचे दात उपटले जातात.

11 वृद्ध सिंह भक्ष्य न मिळाल्यामुळे मरतो, सिंहिणीचे छावे चोहोकडे पांगतात.

12 एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली;

13 रात्री माणसे निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टान्त होऊन मी विचारलहरींत मग्न झालो असता,

14 मला भीती प्राप्त होऊन मी थरथरा कापू लागलो, माझी हाडे लटलटू लागली;

15 माझ्या तोंडाजवळून वायुस्वरूपी1 असा कोणी गेला; तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

16 तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही; तरी माझ्यासमोर काही आकृती होती; मी मंद वाणी ऐकली की,

17 ‘मर्त्य मानव ईश्वरापुढे नीतिमान ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय?

18 पाहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरत नाही; तो आपल्या दिव्यदूतांना प्रमाद केल्याचा दोष लावतो;

19 तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाय मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्यापुढे काय पाड! ते पतंगासारखे चिरडले जातात.

20 सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्नभिन्न होतात; त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही.

21 त्यांच्या राहुटीचा तणावा कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्तीविना ते मरून जातात.”’

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan