Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देवाच्या न्याय्यत्वाचे अलीहू समर्थन करतो

1 अलीहू आणखी म्हणाला,

2 “समंजस लोकहो, तुम्ही माझे बोलणे ऐका; अहो, जाणते लोकहो, कान द्या.

3 अन्नाची परीक्षा जशी जिभेला होते, तशी शब्दांची परीक्षा कानाला होते.

4 आता न्याय्य असेल ते आपण निवडून घेऊ; चांगले काय ह्याचा आपण आपसांत निवाडा करू.

5 आता ईयोब म्हणतो की, ‘मी निर्दोष आहे; देवाने माझ्यावर अन्याय केला आहे;

6 माझा पक्ष खरा असता मी खोटा ठरलो आहे; मी निरपराध असता माझा घाय असाध्य आहे.’

7 ईश्वरनिंदा उदकाप्रमाणे प्राशन करणारा ईयोबासारखा मनुष्य कोण आहे?

8 तो अधर्म करणार्‍यांबरोबर संगती करतो, दुर्जनांची सोबत धरतो.

9 तो म्हणतो ‘देवाशी सख्य ठेवून मनुष्याला काय लाभ होतो?’

10 ह्याकरता समंजस जनहो, माझे ऐकून घ्या; देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.

11 तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो.

12 देव नि:संशय काही वाईट करीत नाही, सर्वसमर्थ प्रभू विपरीत न्याय करीत नाही.

13 ही पृथ्वी त्याच्या स्वाधीन कोणी केली आहे? ह्या सर्व जगाची व्यवस्था कोणी लावली?

14 त्याचे चित्त स्वतःकडेच असले, त्याने आपला आत्मा व श्वास आवरून स्वत:च्या ठायी परत घेतला,

15 तर सर्व जीवधार्‍यांचा एकदम प्राणान्त होईल; मानव पुन्हा मातीत मिळेल.

16 आता समजून घे, हे ऐक; माझ्या तोंडून शब्द निघतील त्यांकडे कान दे.

17 जो न्यायाचा वैरी तो शास्ता होईल काय? जो न्यायी, जो समर्थ, त्याला तू दोषी ठरवशील काय?

18 ‘तू अधम आहेस,’ असे राजाला म्हणणे, ‘तुम्ही दुष्ट आहात’ असे अमिरांना म्हणणे उचित होईल काय?

19 जो अमिरांची भीड राखत नाही, जो श्रीमंताला गरिबांहून अधिक मानत नाही, (कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.) त्याला निर्दोष ठरवणे उचित होईल काय?

20 लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात; बलिष्ठ जन कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात.

21 कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते; त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो.

22 अधर्मी ज्यात लपून राहतील असा काळोख, असा घोर अंधकार नाही.

23 मनुष्याने देवाच्या न्यायासनापुढे जावे म्हणून त्याला त्याच्याकडे आणखी लक्ष पुरवण्याचे प्रयोजन नसते.

24 तो बलिष्ठांचा चुराडा करतो आणि त्यांच्या स्थानी दुसर्‍यांना स्थापतो; त्याला त्यांची चौकशी करावी लागत नाही.

25 ह्याप्रमाणे तो त्यांची कृत्ये जाणतो; तो त्यांना रात्री असा उलथून टाकतो की त्यांचा चुराडा होतो.

26 ते दुष्ट आहेत म्हणून त्यांना तो लोकांसमक्ष ताडन करतो;

27 कारण त्याला अनुसरण्याचे सोडून त्याचा कोणताही मार्ग त्यांनी ध्यानात आणला नाही.

28 त्यांच्या करणीमुळे कंगालांचा आक्रोश त्याच्यापर्यंत गेला; दीनांची आरोळी त्याच्या कानी गेली.

29 त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;

30 हे अशासाठी की अधर्माचे राज्य होऊ नये, व लोकांना कोणी मोहपाशात घालू नये.

31 देवाला कोणी कधी म्हटले काय की ‘मी निरपराध असून शिक्षा भोगली;

32 जो माझा अपराध मला दिसत नाही तो मला दाखव; मी जर वाईट केले असेल तर ह्यापुढे मी तसे करणार नाही?’

33 देवाकडून मिळणारे प्रतिफळ तुला तुच्छ वाटते; तर ते काय तुझ्या मनाप्रमाणे असावे? तू पाहिजे तर आवडनिवड कर, मी नाही; तुला काय वाटते ते सांग.

34 सर्व समंजस लोक, माझे भाषण ऐकणारे सर्व शहाणे पुरुष असे म्हणतील की,

35 ‘ईयोब अज्ञानाने बोलत आहे; त्याचे बोलणे समंजसपणाचे नाही.’

36 शेवटपर्यंत ईयोबाची कसोटी पाहावी हे बरे; कारण दुष्टाप्रमाणे त्याने उत्तरे दिली आहेत.

37 आपल्या पापात आणखी अमर्यादेची भर त्याने घातली आहे; आमच्यादेखत तो टाळी वाजवतो आणि देवाविरुद्ध बेसुमार बोलतो.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan