Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


अलीफज ईयोबावर भयंकर दुष्टाईचा दोष लादतो

1 मग अलीफज तेमानी म्हणाला,

2 “मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वत:चाच लाभ करून घेतो.

3 तू नीतिमान असलास तर तेणेकरून सर्वसमर्थाला काही सुख होते काय? तू सात्त्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय?

4 तो तुझा भक्तिभाव पाहून तुझा निषेध करतो व तुझ्याशी वाद चालवतो काय?

5 तुझी दुष्टाई मोठी आहे; तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना?

6 तू विनाकारण आपल्या बंधूचे गहाण अडकवून ठेवलेस; उघड्यानागड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतलीस.

7 थकल्याभागलेल्यांना तू पाणी दिले नाहीस, भुकेलेल्यांना अन्न घातले नाहीस.

8 जबरदस्ताच्या हाती भूमी गेली; प्रतिष्ठित पुरुषानेच तिच्यात वस्ती केली.

9 तू विधवांना रिक्त हस्ते लावून दिलेस, पोरक्यांचे हात मोडून टाकलेस;

10 म्हणूनच तुला चोहोकडून पाशांनी घेरले आहे; भीतीने तुला अकस्मात घाबरे केले आहे.

11 काळोख आणि महापूर तुला व्यापून टाकत आहेत, हे तुला दिसत नाही काय?

12 देवाचा निवास उंच गगन आहे ना? अतिशय वरच्या तार्‍यांकडे पाहा, ते किती उंच आहेत!

13 तू म्हणतोस, ‘देवाला काय कळते? दाट अंधाराच्या आडून तो कशी न्यायाधीशी चालवील?’

14 निबिड मेघ त्याला आच्छादतात म्हणून त्याला दिसत नाही; आकाशमंडळातच त्याचा संचार होतो.

15 ज्या मार्गाने दुर्जन गेले त्याच प्राचीन मार्गाने तू जाणार काय?

16 ते अकाली उच्छेद पावले, त्यांच्या पायाखालच्या भूमीचे विरघळून पाणी झाले;

17 ते देवाला म्हणाले, ‘तू आमच्यापासून दूर हो; सर्वसमर्थ आमचे1 काय करणार?’

18 तरी त्याने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली होती; दुष्टांची मसलत माझ्यापासून दूर असो.

19 हे पाहून नीतिमान आनंद पावतात; निर्दोष जन त्यांचा उपहास करून म्हणतात,

20 ‘खरोखर आमच्या विरोधकांचा उच्छेद झाला आहे. अग्नीने त्यांच्या संपत्तीचा शेष खाऊन टाकला आहे.’

21 त्याच्याशी2 सख्य कर आणि शांतीने राहा; अशाने तुझे कल्याण होईल.

22 आता त्याच्या तोंडून नियमांचे शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठव.

23 तू सर्वसमर्थाकडे वळलास आपल्या डेर्‍यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल.

24 तू आपले सुवर्ण धुळीत टाक; ओफीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यांत फेकून दे;

25 म्हणजे सर्वसमर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रुपे असा होईल.

26 मग सर्वसमर्थाच्या ठायी तू आनंद पावशील, तू आपले मुख देवासमोर वर करशील.

27 तू त्याची प्रार्थना केलीस म्हणजे तो तुझे ऐकेल; आणि तू आपले नवस फेडशील.

28 तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल; तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल;

29 त्या मार्गांनी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला,1 तर तू ‘वर! वर!’ असेच म्हणशील; कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील.

30 जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो; तुझ्या हातांच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan