Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देव आपल्याला निर्दोष ठरवील ही ईयोबाची खातरी

1 मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,

2 “तुम्ही कोठवर माझ्या जिवाला दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार?

3 एवढ्यात दहा वेळा तुम्ही माझी अप्रतिष्ठा केली; तुम्ही माझ्याशी निष्ठुरतेने वागता ह्याची तुम्हांला लाज कशी वाटत नाही?

4 मी काही चूक केलीच असली, तर ती माझी मला.

5 तुम्ही माझ्यावर खरोखर तोरा मिरवणार आणि माझ्या पदरी अप्रतिष्ठा घालणार,

6 तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे; त्याने माझ्यावर आपले जाळे टाकले आहे.

7 मी ‘जुलूम! जुलूम!’ असे ओरडतो पण कोणी ऐकत नाही; मी दाद मागतो पण मला न्याय मिळत नाही.

8 त्याने माझा रस्ता अडवला आहे. मला पुढे जाता येत नाही; त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे;

9 त्याने माझे वैभव हरण केले आहे; माझ्या डोक्यावरला मुकुट त्याने काढला आहे

10 त्याने मला चोहोकडून भग्न केले आहे व माझे आटोपले आहे; त्याने वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे.

11 त्याने माझ्यावर आपला कोप भडकवला आहे; तो मला आपल्या शत्रूंत गणत आहे.

12 त्यांच्या फौजा जमून माझ्यावर मोर्चा लावत आहेत; त्यांनी माझ्या डेर्‍याभोवती तळ दिला आहे.

13 त्याने माझ्या भाऊबंदांना माझ्यापासून दूर केले आहे; माझ्या ओळखीपाळखीचे मला पारखे झाले आहेत.

14 माझे आप्त मला अंतरले आहेत; माझे इष्टमित्र मला विसरले आहेत.

15 माझ्या घरचे दास व दासी मला परका समजतात; त्यांच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे.

16 माझ्या दासाला मी हाक मारतो तरी तो मला उत्तर देत नाही; मला तोंडाने त्याची विनवणी करावी लागते.

17 माझा श्वास माझ्या स्त्रीला अप्रिय वाटतो; माझ्या सहोदरांना माझी किळस येते.

18 पोरेसोरेदेखील मला तुच्छ लेखतात; मी उठायला लागलो असता माझी चेष्टा करतात.

19 माझे सगळे जिवलग मित्र माझा तिटकारा करतात; ज्यांच्यावर मी प्रेम करी ते माझ्यावर उलटले आहेत.

20 माझे मांसचर्म जीर्ण होऊन हाडांना लागले आहे; मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे.

21 माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा हो, दया करा; कारण देवाचा हात माझ्यावर पडला आहे.

22 देव करीत आहे तसा तुम्ही माझा छळ का करता? तुम्ही असोशीने माझे मांस का तोडता?

23 माझे शब्द लिहून काढले, ते ग्रंथात लिहून ठेवले,

24 लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले, तर किती बरे होईल!

25 मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील;

26 ही माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन;

27 त्याला मी स्वतः पाहीन, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे!

28 ह्या सगळ्याचे मूळ माझ्या ठायीच आढळून आले आहे, म्हणून ‘ह्याचा छळ आपण कोणत्या प्रकारे करावा,’ असे तुम्ही म्हणाल,

29 तर तुम्ही तलवारीचे भय धरा; कारण क्रोधाबद्दल तलवारीचे शासन होते, ह्यावरून न्याय आहे हे तुम्हांला समजावे.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan