Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


दुष्टाच्या अंताचे बिल्दद वर्णन करतो

1 मग बिल्दद शूही म्हणाला,

2 “तुम्ही कोठवर शब्द शोधून योजत बसाल? तुम्ही समज घ्या, मग आम्ही बोलू.

3 तुमच्या हिशोबी आम्ही पशू का ठरलो? तुमच्या दृष्टीने आम्ही अशुद्ध का झालो?

4 अरे क्रोधाने स्वतःस फाडून टाकणार्‍या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय?

5 तरी दुष्टाचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही.

6 त्याच्या डेर्‍यातला प्रकाशाचा अंधकार होईल, त्याचा लामणदिवा विझून जाईल.

7 त्याच्या जोराच्या ढांगा संकोच पावतील, त्याचीच युक्ती त्याचा निःपात करील.

8 तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो, तो पाशात पाऊल टाकत आहे.

9 त्याची टाच सापळ्यात अडकते; पाश त्याला धरून ठेवतो.

10 त्याच्यासाठी पाश जमिनीत गुप्त ठेवला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवला आहे.

11 त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते.

12 त्याची शक्ती क्षुधिताप्रमाणे क्षीण होईल; तो केव्हा पडेल ह्याची अरिष्ट वाट पाहत आहे.

13 ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल; मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील.

14 ज्या डेर्‍याचा तो भरवसा धरी त्यातून त्याला ओढून काढतील; त्याला भयाच्या राजापुढे हजर करतील.

15 जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेर्‍यात वास करतील त्याच्या वसतिस्थानांवर गंधक उधळतील.

16 खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डाहळी छाटतील.

17 देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही.

18 ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटतील, त्याला जगातून पळवतील.

19 त्याच्या लोकांत त्याचे कोणी पुत्रपौत्र आढळणार नाहीत; त्याच्या बिर्‍हाडात कोणी उरणार नाही.

20 त्याचा दुर्दिन पाहून पश्‍चिमेकडे राहणारे चकित होतील, पूर्वेकडे राहणारे कंपित होतील.

21 कुटिलाच्या निवासांचे निःसंशय असेच होणार; देवाला न ओळखणार्‍याच्या स्थानाचे असेच होणार.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan