इय्योब 15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)अलीफज ईयोबाला दोष देतो 1 मग अलीफज तेमानी म्हणाला, 2 “सुज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वार्याने भरील काय? 3 निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय? 4 तू तर देवाचे भय सोडले आहेस; तू देवचिंतनाचा संकोच करतोस. 5 तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलण्यास शिकवतो; तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते. 6 तुझेच तोंड तुला दोषी ठरवत आहे, मी नाही; तुझ्याच मुखावाटे तुझ्याविरुद्ध साक्ष निघत आहे. 7 पहिला पुरुष असा तूच जन्मलास काय? पर्वतांपूर्वी तुझी उत्पत्ती झाली काय? 8 देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूच घेतला आहेस काय? 9 आम्हांला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे? आम्हांला अवगत नाही अशी तुला काय माहिती आहे? 10 पिकलेल्या केसांचे, वयाने वृद्ध, तुझ्या बापाहून अधिक वयाचे असे पुरुष आमच्यात आहेत. 11 देवाने केलेले सांत्वन आणि तुझ्याशी केलेली सौम्य भाषणे तुला तुच्छ वाटतात काय? 12 तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवतोस? 13 तुझ्या संतापाचा रोख देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस? 14 मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार? 15 पाहा, देव आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरीत नाही; आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही. 16 तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा! 17 मी तुला समजावून सांगतो; माझे ऐकून घे; मी जे स्वतः पाहिले आहे ते तुला निवेदन करतो; 18 (ह्या गोष्टी ज्ञान्यांनी आपल्या वाडवडिलांपासून ऐकून सांगितल्या, गुप्त ठेवल्या नाहीत; 19 त्यांनाच काय तो देश दिला होता; कोणा परक्याचा त्यात प्रवेश होत नव्हता;) 20 दुर्जन जन्मभर आणि जुलमी मनुष्य त्याची आयुष्यमर्यादा संपेपर्यंत यातना भोगतो. 21 दहशतीचा शब्द त्याच्या कानात घुमत असतो; भरभराटीच्या काळात विध्वंसक त्याच्यावर चालून येईल. 22 अंधारातून परत येण्याची त्याला आशा नसते; तलवार त्याच्यावर टपलेली असते. 23 अन्नान्न करीत तो चोहोकडे भटकतो. अंधकारमय दिवस आपल्यासमीप आहे हे त्याला ठाऊक आहे; 24 संकट व क्लेश ही त्याला घाबरवतात; लढाईस सज्ज झालेल्या राजासारखी ती त्याला घेरतात; 25 कारण त्याने देवावर हात उचलला आहे, व सर्वसमर्थाशी उद्दामपणा केला आहे. 26 त्याने आपली मान ताठ करून, आपल्या ढालीची जाड बोंडे पुढे करून त्याच्यावर हल्ला केला आहे; 27 त्याच्या तोंडावर चरबी चढली आहे; त्याच्या कंबरेत चरबी जमली आहे. 28 ओसाड नगरात, राहण्यास अयोग्य अशा घरात, ओस व्हावे म्हणून सोडलेल्या जागेत तो राहत आहे. 29 तो धनवान व्हायचा नाही, त्याची मत्ता टिकायची नाही; त्याची पिके भाराने भूमीपर्यंत लवणार नाहीत. 30 अंधारातून त्याची सुटका होणार नाही; ज्वाला त्याच्या फांद्या सुकवील; तो देवाच्या मुखश्वासाने नाहीसा होईल. 31 त्याने स्वतःला फसवून निरर्थक गोष्टीवर भरवसा ठेवू नये; कारण अनर्थ हेच त्याला प्रतिफळ मिळेल. 32 त्याचा काळ येण्यापूर्वीच ते तो भोगील; त्याची झावळी हिरवी राहणार नाही. 33 द्राक्षांप्रमाणे त्याची अपक्व फळे झडतील; जैतून झाडाच्या फुलांप्रमाणे त्याची फुले गळतील. 34 देवहीनांचा परिवार फलहीन होईल; लाच घेणार्यांचे डेरे अग्नी भक्षील. 35 त्यांना अपकाराचा गर्भ राहून ते अरिष्टास जन्म देतात; त्यांच्या पोटात कपट उद्भवते.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India