इय्योब 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)आयुष्याच्या क्षणभंगुरतेविषयी ईयोबाचे विचार 1 “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. 2 तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही. 3 अशावर तू डोळा ठेवतोस काय? अशा मला तू आपल्या न्यायासनासमोर नेतोस काय? 4 अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही. 5 मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे; त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे; तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहेस, ती त्याला ओलांडता येत नाही; 6 म्हणून त्याच्यावरची आपली दृष्टी काढ व त्याला चैन पडू दे; मजूर रोज भरतो तसे त्याला आपले दिवस भरू दे. 7 वृक्षांची काहीतरी आशा असते; तो तोडला तरी पुन्हा फुटतो; त्याला धुमारा फुटायचा राहत नाही. 8 जमिनीत त्याचे मूळ जून झाले असले, त्याचे खोड मातीत सुकून गेले असले; 9 तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते, नव्या रोपाप्रमाणे त्याला फांद्या येतात; 10 पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो; मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे असतो? 11 समुद्राचे पाणी आटून जाते, नदी आटून कोरडी होते; 12 तसा मनुष्य पडला म्हणजे तो पुन्हा उठत नाही; आकाशाचा विलय होईतोवर तो जागृत होणार नाही; आणि त्याला झोपेतून कोणी जागे करणार नाही. 13 तू मला अधोलोकात लपवशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेवशील, माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल! 14 मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. 15 तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृती त्या माझ्याविषयी तुला उत्कंठा लागेल; 16 पण सध्या तू माझे एकेक पाऊल मोजत आहेस; माझ्या पापावर तू सक्त नजर ठेवत आहेस ना? 17 माझे पातक थैलीत घालून मोहरबंद केले आहेस; माझा अधर्म तू वज्रलेप करून ठेवतोस. 18 पर्वत कोसळून कोसळून लय पावतो; खडक आपल्या जागचा ढळतो; 19 पाण्याने पाषाण झिजतो; त्याच्या पुराने पृथ्वीवरील माती वाहून जाते; त्याप्रमाणे तू मनुष्याची आशाही नष्ट करतोस. 20 तू त्याला कायमचा जेरीस आणतोस, आणि तो गत होतो; तू त्याची चर्या बदलून त्याला घालवून देतोस. 21 त्याच्या पुत्रांची उन्नती होते ती त्याला कळत नाही; त्यांची अवनती होते ती त्याला दिसत नाही. 22 त्याच्या देहाला दु:ख होते, त्याचे अंतर्याम शोकाकुल होते.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India