Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


ईयोब आपल्या नीतिमत्त्वाचे समर्थन करतो

1 “पाहा, हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलेच आहे, माझे कान हे ऐकून समजलेच आहेत.

2 तुम्हांला कळते ते मलाही कळते; मी काही तुमच्याहून कमी नाही.

3 खचीत मी सर्वसमर्थाशी बोलणार; मी देवापुढे वाद चालवू इच्छितो.

4 तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही सर्व कवडीमोल वैद्य आहात.

5 अहो! तुम्ही अगदी गप्प राहाल तर बरे; ह्यात तुमचा शहाणपणा दिसेल.

6 आता माझे म्हणणे ऐकून घ्या; माझ्या तोंडच्या प्रतिवादाकडे कान द्या.

7 काय? तुम्ही देवाच्या पक्षाने विपरीत भाषण करता? त्याच्या पक्षाने कपटभाषण करता?

8 तुम्ही त्याचे पक्षपाती होणार काय? देवाची वकिली करणार काय?

9 तुमची त्याने पारख केली तर ते तुम्हांला बरे वाटेल काय? मनुष्य मनुष्याला फसवतो तसे तुम्ही त्याला फसवाल काय?

10 तुम्ही कपटाने पक्षपात कराल तर तो खातरीने तुमचे करणे उघडकीस आणील.

11 त्याच्या माहात्म्याने तुम्ही घाबरे होणार नाही काय? त्याचा धाक तुम्हांला वाटणार नाही काय?

12 ही कर्णोपकर्णी आलेली तुमची वचने केवळ राखेच्या म्हणी होत; तुमचे कोट केवळ मातीचे होत.

13 गप्प राहा, माझ्याआड येऊ नका म्हणजे मी बोलेन; मग काय होईल ते होवो.

14 मी आपले मांस दाती का धरावे? मी आपला प्राण मुठीत का धरावा?

15 तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन;1 तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्यासमोर मी समर्थन करीन.

16 ह्यातच माझे तारण होईल; कारण भक्तिहीन त्याच्यासमोर येणार नाही.

17 अहो, चित्त देऊन माझे भाषण ऐका; माझे म्हणणे तुमच्या कानी पडू द्या.

18 आता पाहा, मी आपल्या दाव्याची पुरी तयारी केली आहे; मी निर्दोष ठरेन हे मला माहीत आहे.

19 माझा कोण प्रतिवादी होईल? कोणी झाला तर मी गप्प राहून प्राण सोडीन.

20 दोनच गोष्टी मात्र करू नकोस, म्हणजे मग मी तुझ्यापासून तोंड लपवणार नाही. माझ्यावरला आपला हात काढ,

21 आणि मला धाक घालून घाबरे करू नकोस.

22 मला बोलाव, म्हणजे मी बोलेन, नाहीतर मी बोलतो आणि मग तू त्याचे उत्तर दे.

23 माझी अधर्मकृत्ये व माझी पातके किती आहेत! माझा अपराध व माझे पाप मला दाखवून दे.

24 तू आपले तोंड का लपवतोस? मला आपला वैरी का लेखतोस?

25 इकडून तिकडे उडणार्‍या पानांचा तू पिच्छा पुरवतोस काय? शुष्क भुसाच्या पाठीस लागतोस काय?

26 तू माझ्या नावावर कठीण शिक्षा लिहितोस, माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगायला लावतोस.

27 तू माझे पाय खोड्यांत घालतोस आणि माझ्या सगळ्या चालचलणुकीवर नजर ठेवतोस; तू माझ्या पावलांभोवती रेषा मारतोस.

28 मी सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालो आहे.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan