Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सोफर ईयोबावर दोषारोप लादतो

1 मग सोफर नामाथी म्हणाला,

2 “हा शब्दांचा पूर उत्तर दिल्यावाचून वाहू द्यावा काय? वाचाळ खरा ठरावा काय?

3 तुझ्या वटवटीने लोकांची तोंडे बंद होतील काय? तू निंदा करीत असता तुला कोणी फजीत करणार नाही काय?

4 तू म्हणतोस, ‘माझा सिद्धान्त शुद्ध आहे; देवाच्या दृष्टीने मी स्वच्छ आहे.’

5 देव जर बोलता, तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडता,

6 तो ज्ञानाचे रहस्य तुला निवेदन करता, आपले चातुर्य बहुगुणित आहे हे तुला तो दाखवता तर किती बरे होते! देव तुझ्या बहुत अपराधांकडे कानाडोळा करतो हे लक्षात आण.

7 देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय?

8 ते गगनाइतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय कळणार?

9 त्याचे परिमाण म्हटले तर ते भूगोलाहून लांब व समुद्राहून रुंद आहे.

10 भ्रमण करीत असता त्याने एखाद्याला पकडून अटकेत टाकले, आणि न्यायसभा भरवली, तर त्याचा हात कोण धरील?

11 आचारशून्य मनुष्याला तो ओळखतो; विचार करावा न लागता त्याला दुष्टता दिसून येते.

12 रानगाढवाचा मनुष्य बनेल तर अक्कलशून्य मनुष्याला समज प्राप्त होईल.

13 आपले हृदय नीट करशील, देवाकडे आपले हात पसरशील,

14 तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेर्‍यात अन्याय राहू देणार नाहीस,

15 तर निश्‍चये तू आपले निष्कलंक मुख वर करशील; तू स्थिर होशील, निर्भय होशील;

16 कारण तू आपले दुःख विसरशील; ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल;

17 तुझे जीवित मध्यान्हसमयाहून तेजस्वी होईल; अंधकार असला तरी तो प्रभातेसारखा होईल.

18 तुला उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू चोहोकडे पाहून निर्धास्त आराम करशील.

19 तू झोपी जाशील तेव्हा तुला कोणी भिवविणार नाही; बहुत लोक तुझे आर्जव करतील.

20 दुष्टांचे डोळे थकतील; त्यांना कोणतेही शरणस्थान राहणार नाही; प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan